नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टीसीएस नाशिक प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्याविरोधात तिचे पती मोईन खान यांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर शुक्रवारी (दि. २०) नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान समुपदेशन प्रक्रियेचा दुसरा टप्पा पार पडणार असून, न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी दोन्ही पक्षकार कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश पी. एल. पलसिंगणकर यांच्या न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन्ही बाजूंनी प्राथमिक समुपदेशन प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यानंतर पुढील सुनावणी आणि समुपदेशनासाठी २० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती.
मोईन खान यांनी पत्नी निदा खान हिच्याविरोधात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर त्यांच्यातर्फे विधिज्ञ ॲड. नितीन पंडित कामकाज पाहत आहेत. तर निदा खान हिच्यातर्फे विधिज्ञ ॲड. शोभा ताजनपुरे न्यायालयात बाजू मांडत आहेत. कौटुंबिक न्यायालयातील नियमानुसार घटस्फोटाच्या प्रकरणात समुपदेशनाला महत्त्व असते.
पती-पत्नीमधील मतभेद दूर करून समेट घडवून आणण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया राबवली जाते. दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्यातील मतभेदांची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न समुपदेशनाद्वारे केला जातो. तसेच वैवाहिक नातेसंबंध कायम ठेवण्याबाबत दोन्ही बाजूंची भूमिका जाणून घेतली जाते. मात्र, समेट न झाल्यास याचिकेवरील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहते.
उद्याच्या सुनावणीत दुसऱ्या टप्प्यातील समुपदेशन होणार असल्याने या प्रक्रियेतून काय निष्पन्न होते, तसेच दोन्ही पक्षकारांची पुढील भूमिका काय राहते, याकडे लक्ष लागले आहे. टीसीएस प्रकरणामुळे निदा खान हिचे नाव चर्चेत असल्याने या घटस्फोट याचिकेच्या पुढील घडामोडींकडेही लक्ष दिले जात आहे.