नाशिक : येथील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचार्यांचे लैंगिक शोषण व कथित धर्मांतर प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यातील प्रमुख संशयित एचआर मॅनेजर निदा खान अजूनही फरार असून तपासादरम्यान तिचा संपर्क दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी डॉ. शाहीन शाहीद हिच्याशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने आता अधिकच गंभीर वळण घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
टीसीएस कंपनी प्रकरणात आतापर्यंत 9 महिला कर्मचार्यांनी 6 आरोपींविरोधात लैंगिक शोषण, छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप करत गुन्हे दाखल केले आहेत. काही कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, निदा खान महिलांचे ब्रेनवॉश करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होती. इस्लामी प्रथा, पोशाख आणि धार्मिक आचरणाबाबत मार्गदर्शन केले जात होते. त्यामुळे कार्यस्थळी दबाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आरोपींच्या आर्थिक व्यवहारांवरही संशय व्यक्त होत आहे. त्यांच्या बँक खात्यांची तपासणी सुरू असून पगाराव्यतिरिक्त बाहेरील स्रोतांकडून निधी मिळत होता का, याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात निदा खान ही केवळ एचआर नसून, महत्त्वाचा दुवा आणि संभाव्य मास्टरमाईंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
डॉ. शाहीन शाहिद ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधित
डॉ. शाहीन शाहिद ही 10 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार ती फरिदाबाद येथील अल-फलाह मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होती. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी तिचे संबंध असल्याचा आरोप आहे. एनआयए व यूपी एटीएसच्या तपासात ती व्हाईट कॉलर टेररिझम नेटवर्कचा भाग असल्याचे समोर आले आहे. याच डॉ. शाहीनशी टीसीएस प्रकरणातील निदा खानचा संपर्क असल्याचे समोर आले आहे.