Nida Khan case pudhari
नाशिक

Nida Khan case |निदा खानची हकालपट्टी; ‘टीसीएस’चे पत्र जारी

नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची मास्टरमाइंड अद्याप फरार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : येथील टीसीएस या आयटी कंपनीत महिला कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान सध्या फरार आहे. यादरम्यान, तिच्यावर कंपनीने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने निदा खानला तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित केले असून, तसे अधिकृत पत्र जारी केले आहे. संबंधित कंपनीचे हे पत्र 9 एप्रिल रोजीचे असल्याची माहिती समोर आली आहे.

निदा खान हिला पाठवलेल्या निलंबन पत्रात अत्यंत कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. ‘तुमच्याविरुद्ध एक अत्यंत गंभीर प्रकरण नोंदवले गेल्याची माहिती कंपनीला मिळाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता व्यवस्थापनाने तुम्हाला तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांचा तपास वेगाने

दरम्यान, निदा खान ही मूळची नाशिकच्या द्वारका परिसरातील रहिवासी असून, 2021 पासून ती संबंधित कंपनीत कार्यरत होती. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी निदा खान बाहेरून सामान्य जीवन जगत असल्याचे चित्र होते. मात्र, या प्रकरणात तिच्यावर गंभीर आरोप झाल्याने तिच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तिच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता असून, पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.

का झाली कारवाई?

निदा खान ही संबंधित कंपनीत प्रोसेस असोसिएट म्हणून कार्यरत होती. मात्र, तिच्यावर हिंदू तरुणींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, त्यांना टार्गेट करणे आणि विरोध करणार्‍यांचा मानसिक व लैंगिक छळ करण्यासाठी चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, कंपनीने आपली प्रतिमा जपण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

हिंदू तरुणावर इस्लामिक संस्कारांचा दबाव?

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणार्‍या तौसीफ खानचा एक जुना व्हिडीओ समोर आला असून, यामध्ये तो एका हिंदू तरुणाचे धर्मांतर करत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. या तरुणाला तौसीफ खान मुस्लिम धर्माचे आचरण करण्यास भाग पाडत असल्याचे प्राथमिकद़ृष्ट्या दिसून येते. हा व्हिडीओ तौसीफच्या धर्मांतराचा पुरावा मानला जात आहे.

निदा खान गर्भवती असल्याच्या दाव्याने खळबळ

धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिच्याबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. 21 दिवसांपासून फरार असलेली निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. आता ती गर्भवती असल्याचा दावा समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खानने नाशिकरोड न्यायालयात अर्ज दाखल केला असून, या अर्जावर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT