नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी हवाई प्रवेशद्वार ठरणाऱ्या ओझर विमानतळाचे नवे एकात्मिक टर्मिनल मार्च २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसमवेत कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या पाहणीत कामाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास असून, टर्मिनलबरोबरच विमानतळाला जोडणारे रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ वरील सुरक्षा सुविधांची कामेही वेळेत पूर्ण करण्यासाठी कुंभमेळा प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
त्यामुळे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी कामांना गती देऊन ३१ मार्च २०२७ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक आणि इतर नागरिक येणार असल्याने विमानतळाची क्षमता, त्याला जोडणारी रस्ते व्यवस्था आणि महामार्गावरील सुरक्षितता या तिन्ही बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
महामार्गापासून विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून, या भागात महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्नही मोठा आहे. या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळापासून पुढील रस्ते जोडणीपर्यंतच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा एकत्रित आढावा घेण्यात आला.
सिंहस्थ काळात ओझर विमानतळ नाशिकचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार आहे.
त्यामुळे विमानतळाचे टर्मिनल, त्याला जोडणारे रस्ते आणि महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था एकाच वेळी सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक कामाच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवून अडथळे दूर करण्याच्या आणि कामांना आवश्यक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विमानतळावर सुरू असलेल्या नव्या टर्मिनल इमारतीच्या कामाची आयुक्तांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि प्राधिकरणाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करीत बांधकामाची सद्यःस्थिती आणि वेळापत्रकाचा आढावा घेत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या.
मुदत व लक्ष्य : नवीन एकीकृत टर्मिनलचे बांधकाम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
इतर पायाभूत सुविधा : राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ला जोडणारे रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि सुरक्षा व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यावर भर.
प्रमुख उपस्थिती : कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, MSRDC/MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित व उपायुक्त योगेंद्र चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.