नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सध्या तीन हजारांहून अधिक बंदिवान कैदी बंदिस्त आहेत. या कारागृहाची मूळ क्षमता मर्यादित असल्याने, वाढत्या कैद्यांमुळे कारागृह प्रशासनावर मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मालेगाव आणि भुसावळ येथे नवीन कारागृह उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे.
भुसावळ येथील कारागृहासाठी जागा निश्चित झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, तर मालेगाव येथेही कारागृह उभारण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. माजी पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या कार्यकाळात मालेगाव येथे कारागृह उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आता मालेगाव येथेही लवकरच नवीन कारागृह उभारले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मोठ्या क्षमतेचे कारागृह असून, ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि देशातील महत्त्वाच्या कारागृहांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी देशातील तसेच परदेशातील अनेक महत्त्वाच्या खटल्यांतील आरोपी कैदेत आहेत. मात्र, कैद्यांची वाढती संख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ताण निर्माण झाला आहे.
नवीन कारागृह उभारणीमुळे केवळ कैद्यांचा ताण कमी होणार नाही, तर न्यायालयीन कामकाजालाही गती मिळेल. उत्तर महाराष्ट्रातील न्यायिक व कारागृह व्यवस्थेच्या दृष्टीने या दोन्ही इमारती अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.