येवला (नाशिक) : तालुक्यातील राहाडी गावात नवीन पोस्ट ऑफिस सुरु करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचा आदेश ८ ऑक्टोबरला मालेगाव टपाल कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आला आहे. १० ऑक्टोबर २०२५ पासून रहाडी पोस्ट ऑफिस कार्यान्वित होणार आहे. तसेच भुलेगाव येथे देखील लवकरच पोस्ट ऑफिस मंजूर होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरवठा केला होता.
मंत्री छगन भुजबळ यांनी राहाडी व भुलेगाव गाव येथे पोस्ट ऑफिस सुरू करण्याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहून रहाडी व भुलेगाव येथे पोस्ट ऑफिस सुरु करण्याची मागणी केली होती. यावर मंत्री सिंधिया यांनी राहाडी येथे पोस्ट ऑफिस सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री भुजबळ यांना कळविले होते. २ जानेवारी व ११ सप्टेंबर २०२५ ला देखील मंत्री भुजबळ यांनी पुन्हा पत्र पाठवून याबाबत पाठपुरावा केला होता. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून रहाडी येथे पोस्ट ऑफिस शाखा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. हे पोस्ट ऑफिस येवला सब पोस्ट ऑफिस आणि मनमाड पोस्टल उपविभाग अंतर्गत कार्यरत असेल. तसेच अडसुरेगाव आणि वाघाळा ही गावे आता या राहाडी येथील पोस्ट ऑफिसशी जोडली जाणार आहेत. येथील पिनकोड ४२३४०१ हा असणार आहे. यामुळे नागरिकांना टपाल व बँकिंग सेवा गावातच मिळणार आहे.
राहाडी पोस्ट ऑफिसमधून मिळणाऱ्या सुविधा
नोंदणीकृत व जलद टपाल सेवा. पार्सल व मनी ऑर्डर सेवा. बचत योजना व्यवहार. आर्थिक व्यवहारांसाठी ॲपद्वारे सेवा. टपाल बॅग वाहतुकीसाठी येवला ते तळवाडे आणि तेथून रहाडीपर्यंत जीडीएसमार्फत वहन.