नाशिक : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर नीट-पीजी परीक्षेसाठी केंद्र सरकारने उमेदवारांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. नव्या प्रणालीमुळे परीक्षार्थीना त्यांच्या निवासस्थानाजवळ परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला असून, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नीट-पीजी परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा शहराची माहिती उमेदवारांना जवळपास तीन आठवडे आधीच दिली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सुधारित व्यवस्थेनुसार उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी तीन राज्यांची पसंती नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, या तीन पर्यायांमध्ये उमेदवाराच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर असलेल्या राज्याचा समावेश करणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना त्यांच्या घराजवळ किंवा निवासस्थानाच्या परिसरात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
यापूर्वी परीक्षा केंद्र दूरच्या शहरात मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवास, निवास आणि अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत होता. नव्या बदलांमुळे ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे. परीक्षा केंद्राची माहिती तीन आठवडे आधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासाचे आरक्षण, निवासाची व्यवस्था तसेच इतर आवश्यक नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
परीक्षा अधिक सुलभ व पारदर्शक
आरोग्य मंत्रालयाच्या या सुधारणांमुळे परीक्षा केंद्रांच्या निवडीचा विस्तार होईल, उमेदवारांचा ताण कमी होईल आणि परीक्षा अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने घेणे शक्य होईल. याशिवाय परीक्षेच्या स्वरूपातही बदल करण्यात आले असून, प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवारांना अधिक वेळ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो नीट-पीजी परीक्षार्थीना मोठा दिलासा मिळणार असून, परीक्षा प्रक्रिया अधिक विद्यार्थिकेंद्रित आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.