नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे ई-मेलद्वारे पाठविला असून, त्यांच्या जागी बाळासाहेब देशमुख यांची प्रशासकपदी नियुक्तीची चर्चा आहे.
एनपीए वाढल्याने अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेवर २० फेब्रुवारी २०२२ रोजी शासनाने चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी मोहीम उघडली. थकबाकीदारांच्या घरासमोर तगादे लावले. त्यामुळे सुमारे २० ते २५ टक्के वसुली झाली. या मोहिमेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अपेक्षित वसुली होऊ शकली नाही. दरम्यान थकबाकी वसुलीबरोबरच चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात बँकेत प्रशासकीय शिस्त आणण्यासाठी उपाययोजना केल्या. कर्मचाऱ्यांच्याबाबत काही कठोर निर्णय घेतले. त्यामध्ये वेतनकपातीसारखा व शिस्तभंगाच्या कारवाईचा भाग आहे. सक्तीच्या कर्जवसुलीबाबत शेतकरी संघटनांचा चव्हाण यांच्या भूमिकेला तीव्र विरोध होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चव्हाण यांनी प्रशासकपदाचा राजीनामाही देऊ केला होता. मात्र, तो स्वीकारण्यात आला नव्हता. यावर्षी त्यांच्या कार्यकाळात २३५ कोटी रुपयांची वसुली झाली. कर्जवसुली जोमात आली असताना चव्हाण यांच्या राजीनाम्याची चर्चा पुढे आली आहे. चव्हाण यांनी २४ एप्रिल रोजी ई-मेलद्वारे आपल्या प्रशासकपदाचा राजीनामा पाठवल्याचे सांगितले जात आहे. ते राज्य बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी असून, मूळचे सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहेत.
यासंदर्भात प्रशासक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'नो कॉमेंट्स, योग्यवेळी बोलू' असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.