नाशिक : नाशिकमध्ये युतीच्या चर्चेसाठी पाच मिनिटे तरी वेळ द्या, अशी आर्जव करणाऱ्या राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार यांना भाजपचे प्रभारी तथा कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी भेट नाकारल्याचे समोर आले आहे.
नामांकित हॉटेलमध्ये चर्चेसाठी आलेल्या मंत्री, आमदारांना भाजप नेत्याच्या भेटीसाठी अक्षरश: आर्जव करावी लागत असल्याने राष्ट्रवादीची हतबलता उघड झाली आहे. दरम्यान, शहराबाहेर महाजन यांच्यासोबत भेट झाल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
नाशिक महापालिकेसाठी स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपने आता वरिष्ठ नेत्यांच्या आदेशांनुसार शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटासमवेत महायुतीची चर्चा सुरू केली आहे. तिन्ही तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत बैठक सुरू आहे. परंतु, यात तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाजन हे भाजप नेत्यांशी चर्चेसाठी सोमवारी (दि.२) नाशिक दौऱ्यावर आले होते. पाथर्डी फाट्यावरील नामांकित हॉटेलमध्ये महाजन यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करत शिंदे गट व अजित पवार गटाने केलेल्या जागांच्या मागणी बाबत माहिती जाणून घेतली. या बैठकीला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याठिकाणी राष्ट्रवादीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ, आमदार नितीन पवार, माजी खासदार भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे युती संदर्भात महाजन यांच्याशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले. परंतु, महाजन यांनी त्यांना बराच वेळ वेटींगवर ठेवल्यानंतर महाजन मुंबईच्या दिशेने निघाले. तेव्हा त्यांच्या वाहनाजवळ मंत्री झिरवाळ, आमदार खोसदार हे धावतच गेले. चर्चेसाठी पाच मिनिटं तरी वेळ द्या, अशी विनवणी आमदार खोसकर आणि झिरवाळ यांच्याकडून महाजनांना करण्यात आली. परंतु, मुंबईच्या कार्यक्रमाला वेळ होत असल्याने महाजन यांनी त्यांच्याशी चर्चा न करताच मुंबईच्या दिशेने रवाना झाला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हतबलता दिसून आली.
अवाजवी मागणीमुळे नाकारली भेट?
नाशिक महापालिकेत गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे अवघे सहा नगरसेवक निवडून आले होते. महायुतीच्या जागा वाटपात मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाने ३० जागांची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीसोबत युतीबाबत फेरविचार सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह आमदार, शहराध्यक्ष यांनाही महाजन यांनी टाळल्याची चर्चा आहे.