देवळाली कॅम्प: राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये देवळाली मतदारसंघात विळ्या-भोपळ्याचे वैर असून भगूर नगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेपाठोपाठ आता तलाठी कार्यालय हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
आमदार सरोज अहिरे यांनी 30 लाख रुपये निधी मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जागेवर नव्याने तलाठी कार्यालय उभारण्यासाठी गती दिली. परंतु प्रस्तावित जागा ही नगरपालिकेची असून पालिकेला व स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेताच नियमबाह्य पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप शिंदे गटाचे उपनेते व नाशिक जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी केला.
भगूर नगरपालिकेने यापूर्वीच विकास आराखडा तयार करताना प्रशासकीय कार्यालय, शॉपिंग सेंटर, मलनिसारण केंद्र, शालेय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावात प्रशासकीय इमारतीमध्येच तलाठी कार्यालयासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती करंजकर यांनी दिली. शहरातील सिटी सर्वे नंबर 378/अ ही जागा नगर परिषदेच्या मालकीची आहे. या जागेवर तलाठी कार्यालयाच्या वापरासाठी नगरपरिषदेने विनामूल्य जागा उपलब्ध करून दिलेली आहे. नवीन तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मालकीची जागा नवीन तलाठी कार्यालयासाठी परस्पर वर्ग केली, असा आरोप करंजकर यांचा आहे.
सध्या भगूर नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी प्रशासन भगूर नगरपरिषद यांना आदेश देत नगरपालिकेचा ना हरकत ठराव संमत करुन घेतला. महसूल विभागाने आपल्या कार्यालयासाठी नगरपरिषदेची जागा आपल्या नावावर करून घेतली आहे. परंतु त्यासाठी राज्य शासनाची पूर्व मंजुरी घेणे आवश्यक आहे. ही जागा सिटी सर्वे नंबर 378/अ भगूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार आरक्षण क्रमांक 15 अन्वये नगरपरिषद इमारतीसाठी आरक्षित आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर जागेवर तलाठी कार्यालयाचे कामकाज तात्काळ थांबवावे, अशी मागणी करंजकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नियमबाह्य कारवाईविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर आ. सरोज अहिरे यांनी 30 लाखाचा निधी प्रस्तावित करत भूमिपूजन केले होते. आता त्यांनी हे काम सुरु करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाकडून जुनी इमारत पाडण्याबाबत कार्यवाही सुरू झालेली आहे. काल आ. सरोज आहिरे यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व शहरातील इतरही विविध पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी भगूरच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही, असा शब्द दिलेला असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भगूरमधील कामे हे करंजकर यांच्याच मागणीनुसार मंजूर केल्याचे जाहीर सभेत सांगत आहेत. आगामी नगर परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये कमालीची चुरस दिसून येत आहे.
महसूल विभागाने तलाठी कार्यालयासाठी मालिकेची जागा नावावर करून घेणे हे अयोग्य आहे. पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी ही जागा प्रस्तावित आहे. त्यामुळे अन्याय सहन देखील केला जाणार नाही.विजय करंजकर, शिवसेना उपनेते, नाशिक
जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर नियमानुसार तलाठी इमारत उभी राहणार आहे. आपण जनतेबरोबर असल्यानेच जनता आपल्यासोबत आहेआमदार सरोज अहिरे, नाशिक.