Devi Idol Price Rise  
नाशिक

Devi Idol Price Rise | यंदा नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्ती महागल्या! कच्चा माल अन् मजुरी वाढल्याने 25 ते 30 टक्क्यांनी दरांत वाढ

Devi Idol Price Rise | महागाईची झळ मूर्तिकारांनाही; कच्चा माल, रंग, मजुरी व वाहतूक खर्चात वाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात देवीच्या मूर्ती तयार करण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि पारंपरिक तसेच आधुनिक स्वरूपातील मूर्तींना मागणी वाढत असतानाच यंदा मूर्तीच्या किमतीतही वाढ झाली आहे.
नवरात्रोत्सवासाठी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांकडून देवी मूर्तींची आगाऊ मागणी केली जात आहे.

ग्राहकांच्या पसंतीनुसार मूर्तीची उंची, आकार, अलंकार आणि रंगसंगतीत विविधता आणली जात असल्याचे मूर्तिकार सांगतात. मात्र, मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे.

कुशल कारागिरांची मजुरी आणि वाहतूक खर्चही वाढल्याने मूर्तिकारांसमोर खर्चाचे गणित जुळवण्याचे आव्हान आहे. मेहनत आणि वेळ मोठ्या प्रमाणात खर्च करूनही अपेक्षित नफा मिळत नसल्याची खंत अनेक मूर्तिकार व्यक्त करत आहेत.

ग्राहकांच्या पसंतीत बदल:

यंदा पारंपरिक रूपातील देवीच्या मूर्तींबरोबरच आकर्षक व देखण्या सजावटीच्या मूर्तींना ग्राहकांकडून मागणी आहे. घरगुती नवरात्रोत्सवासाठी मध्यम आकाराच्या मूर्तींना पसंती मिळत आहे. सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या आकाराच्या मूर्तींची मागणी होत आहे.

"मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. दीड फुटापासून ८ फुटांपर्यंत मूर्ती आहेत. १५०० रुपयांपासून ३५ हजार रुपयांपर्यंत त्यांचे दर आहेत. पेणवरून कच्चा माल मागवला जातो. त्यात वाहतूक खर्चासह रंगकामाचा खर्च वाढला आहे. महागाईमुळे २५ ते ३० टक्क्यांचा फरक पडला आहे."
- सुधाकर जोंधळे, मूर्तिकार
"वाहतूक दरात वाढ झाली आहे. महागाईमुळे कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. पर्यावरणपूरक त्यात मुंब्रादेवी सारख्या मूर्तींना पसंती दिसत आहे. १२ फुटांपर्यंत मूर्तींचे दर २५०० रुपयांपासून ३० हजार रुपयांपर्यंत दर आहेत."
- अक्षय काठे, विक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT