नाशिक : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या असून गृहिणींचीही लगबग सुरु आहे. पितृपंधरवड्यात खरेदीसाठी उत्साह नसला तरी सोमवारपासून (दि.२२)सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत.
अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारी (दि. २२) प्रारंभ होत आहे. वर्षभरात चार प्रकारचे नवरात्र साजरे होतात, त्यापैकी शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात येते त्याचे अधिक महत्त्व सांगितले आहे. घटस्थापनेसाठी गृहिणींची लगबग सुरु झाली असून अनेक घरांमध्ये गृहिणांच्या साफसफाई कामांनाही वेग आला आहे. शहरातील देवी मंदिरांवर रंगरंगोटी, मंडप टाकणे, रोषणाई आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहे.
पितृपक्षामुळे खरेदींसाठी ग्राहकांची बाजारात फारशी गर्दी दिसत नसली तरी गोदापटांगणांसह अन्य बाजारपेठेत दांडिया विक्रीसाठी आल्या आहेत. दांडिया, गरबासाठी पारंपरिक पोषाख परिधान केले जातात. त्यासाठी चनिया चोली, घागरा ओढणी, पुरुषांचे केडीया, चुडीदार, कुर्ता पायजमा आदी पोषाख विक्रीसाठी आले आहेत. घट, टोपली-परडी, सजवलेले 'घडवो'(कलश) आदींनीही बाजारपेठ सजली आहे.
घटस्थापनेसाठी अमृत मुहूर्त सकाळी ६.१९ ते ७.४९ मि. तर शुभ मुहूर्त सकाळी ९.१४ ते १०.४९ मि असे आहेत.
अभिजीत मुहूर्त सकाळी ११.५५ ते दुपारी १२.४३ पर्यंत आहे. शुभ आणि अमृत अति उत्तम मुहूर्त आहे.
याकाळात ज्यांना शक्य नसेल त्यांना सायंकाळी ६.२७ ते ६.५७ याकाळात घटस्थापना करता येणार आहे.
दरवर्षी देविचे आगमन वेगवेगळ्या वाहनावरुन होत असते. यावर्षी देविचे आगमन हत्ती वरून असणार आहे. देवी भागवत पुराणात याबद्दल उल्लेख आहे. घटस्थापना आठवड्यातील कोणत्या दिवशी असते यावरून वाहन ठरते. याप्रमाणे घटस्थापना रविवारी किंवा सोमवारी असेल तर देविचे आगमन हत्ती वरुन होते. शनिवार, मंगळवारी असेल तर अश्वारूढ, गुरुवारी किंवा शुक्रवारी असेल तर डोली-पालखी असते. तसेच बुधवारी असेल तर देवी नौकारुढ असते, असे धर्मअभ्यासक सांगतात. देवीच्या आगमनाचे जसे वाहन असते. यावरून भविष्यकालीन घटनांचा अंदाज बांधता येतो, अशी माहिती धर्म अभ्यासक नरेंद्र धारणे यांनी दिली.