ठळक मुद्दे
घोरपडी होताहेत झपाट्याने कमी
मानव-वन्यजीव संघर्ष होतोय अधिक तीव्र
जोरकसपणे सर्वंकष लोकजागृतीची गरज
Maharashtra's state animal, the number of Shekaru is stable
नाशिक : निल कुलकर्णी
गेल्या दहा वर्षांत राज्यातील घोरपडींची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मात्र, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूची संख्या गेल्या तीन वर्षांत केलेल्या गणनेनुसार स्थिर आहे. राज्यातील विविध वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेली सांख्यिकी आणि वन्यजीव अभ्यासकांच्या निरीक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कधी खाण्यासाठी, तर कधी अंधश्रद्धेतून घोरपडींच्या विविध अवयवांची अवैध विक्री यामुळे या वन्यजीवांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, त्यांच्या संवर्धनासाठी वन्यजीव परिक्षेत्र विभागासह सर्वत्र अधिक जोरकसपणे लोकजागृती करण्याची गरज अभ्यासक व्यक्त करत आहेत.
खारीच्या प्रजातीचा शेकरू हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तो सदाहरित व निम्नहरित जंगलांमध्ये उंच झाडावर घरटे करून राहतो. मात्र, एका सर्वेक्षणानुसार याबद्दल ७० टक्के लोकांमध्ये अनिभज्ञता दिसून आली. सांगली, सातारा, कोल्हापूर, सातपुडा पर्वतरांग, नाशिकजवळील भंडारदरा-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात याचा अधिवास आहे. गेल्या तीन वर्षांत या प्राण्याची संख्या स्थिर असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, घोरपडींची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे निरीक्षणही वन्यजीव अभ्यासकांनी नोंदवले.
घोरपड हा पाल प्रजातीतील प्राणी आहे. घोरपडीपासून एक विशिष्ट प्रकारचे तेलसुद्धा बनवले जाते. जे सांधेदुखी, पाठदुखीवर लावल्यास सांधेदुखी पूर्णपणे बरी होते, असा एक समज आहे. जो भयंकर आहे. अंधश्रद्धेपोटी घोरपडीचे अवयव काढून ते पूजाविधीत वापरले जातात. त्यामुळेही गैरसमजुतीमुळे घोरपडींची शिकार मोठ्या प्रमाणात झाली आहे. खाण्यासाठी व औषधे बनवण्यासाठी घोरपडीला मारले जाते. त्यामुळे त्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत ३० ते ४० टक्के कमी झाल्याची माहिती वन्यजीव अभ्यासकांनी दिली. शेतामध्ये विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे शेती प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांचे भक्ष्य कमी होत आहे. यामुळे घोरपडींच्या संख्यादेखील झपाट्याने कमी होत असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले.
2023- 4,500
2024- 4,750
2025 - 5,000
शास्त्रीय नाव : रॅटुफा इंडिका, इंग्रजी नाव : इंडियन जायंट क्स्क्यूरल.
हार्बोरल प्रजाती (कायम वृक्षावर राहणारा)
शेकरू साधारणत : जीवनात तीन घरटी करतो.
शेकरूची लांबी : २५ ते ३६ सेंटीमीटर.
उंच दीर्घउडीसाठी वैशिष्ट्यपूर्ण शेपटी.
सदाहरित आणि निम्नहरित वनात अधिवास
भीमाशंकर वन्यजीव परिक्षेत्रात रस्ते निर्माणात दोन्ही बाजूंचे आच्छादन तुटल्यामुळे शेकरूंना ते त्रासदायक ठरले हाेते. त्यावेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या झाडावर जाता यावे यासाठी खास झाडावरच कृत्रिम पूल तयार केले. भीमाशंकर क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत शेकरूंची संख्या साडेचार हजार ते पाच हजारांपर्यंत स्थिर आहे.तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर
गैरसमज आणि अज्ञानातून अनेक वेळा वन्यजीवांची हत्या केली जाते. काही वर्षांपूर्वी खवल्या मांजराला डायनासोर समजून त्याला मारण्यासाठी गावकरी धावले होते. तिची आम्ही सुटका करून वनविभागाकडे सोपवले होते. अंधश्रद्धा तसेच खाण्यासाठी कधी अन्य कारणांसाठी कडक कायदे असूनही वन्यजीवांची हत्या होते. त्यासाठी सर्वंकष जागृतीची गरज आहे.अभय उजागरे, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक, जळगाव
मानवी हस्तक्षेप, अंधश्रद्धेमुळे घोरपडींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. घोरपडींचे काही अवयव मोठ्या किमतीत अंधश्रद्धेपोटी विकले जातात. घोरपडीचे तेल कंबरदुखी, सांधेदुखीसाठी गुणकारी आहे, अशा काही गैरसमजुतीतून घोरपडींना मारले जाते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत घोरपडींची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली आहे.शेखर गायकवाड, संस्थापक, आपलं पर्यावरण, नाशिक.