मालेगाव : नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकच्या येथील शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद उलाढालीप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक व सहायक व्यवस्थापक या दोघांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सोमवारी (दि. 2) येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
संशयित सिराज अहमद मोहम्मद हरूण मेमन याने 13 बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून महत्वाची कागदपत्रे घेऊन परस्पर नामको बँकेच्या मालेगाव शाखेत चालु खाती उघडली होती. अशा 14 खात्यातून 112 कोटी 61 लाख 97 हजार 187 रुपयांची उलाढाल केली गेली. शिंदेसेनेच्या पदाधिकार्यांनी फसवणूक झालेल्या तरुणांसमवेत पत्रकार परिषद घेत या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर दुसर्याच दिवशी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगावी भेट देत हे प्रकरण 'व्होट जिहाद' असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, पीडित तरुणांपैकी जयेश मिसाळ याने छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार या प्रकरणातील मुख्य संशयित सिराज मेमन याला अटक होऊन सद्या त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. बँकेतील संशयास्पद आर्थिक उलाढाल प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच बँकेचे यापूर्वीच निलंबित केलेले व्यवस्थापक रवींद्र कानडे व सहायक व्यवस्थापक दीपरत्न निकम यांना अधिक तपासासाठी छावणी पोलिसांनी अटक केली आहे.
13 पीडित तरुणांना आयकर विभागाच्या बेनामी मालमत्ता विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना आपले म्हणणे 16 डिसेंबरपर्यंत मांडण्यास सांगितले आहे. आयकर विभागाने खटला दाखल करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. याबाबतची पोस्ट 'एक्स'वर भाजप नेते सोमय्या यांनी केली आहे.