नाशिक : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आता नव्याने 29 जुलैला सुनावणी होणार आहे.
2022 मध्ये नाशिक शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होऊन नागरिकांचे नुकसान झाले. याविरोधात माजी महापौर पाटील यांनी रस्त्यांची पाहणी करून महापालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र महापालिकेकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्यांनी ऑगस्ट 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर रस्त्यांची दुरवस्था कायम राहिल्यामुळे पाटील यांनी ही बाब न्यायालयात निदर्शनास आणून दिली. जानेवारी 2023 मध्ये पाटील यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावर 8 जुलैला सुनावणी झाली न्या. रेवती मोहिते- डेरे व नीला गोखले यांच्या पिठासमोर सुनावणी झाली. 29 जुलैला याचिकेवर सुनावणी होणार आहे.