नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदी असताना जिवे मारण्याचा प्रयत्न, धमकावून जबरदस्तीने स्वाक्षरी घेणे आणि पोलिस अधिकाऱ्यांची बदनामी करण्यासाठी बनावट अर्ज तयार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महेश गोकुळ सोनवणे (२३, रा. सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक लोंढे, हर्षद पाटणकर व वकील यतीश देसले इतरांवर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात मोक्कांतर्गत अटक झाल्यानंतर महेश सोनवणे याला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहात आरोपी हर्षद सुनील पाटणकर हा वारंवार, तू माझ्याविरोधात जबाब का दिला, तुला जिवंत सोडणार नाही, अशा शब्दांत धमकी देत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या धमक्यांमुळे कारागृहात सतत भीतीचे वातावरण निर्माण होत होते.
याच दरम्यान आरोपी दीपक प्रकाश लोंढे व वकील यतीश देसले यांच्या सांगण्यावरून सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, पोलिस निरीक्षक राजपूत आणि सुचित सोळुंके यांच्याविरोधात खोटे आरोप असलेला अर्ज तयार करण्यात आला होता. त्या अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी फिर्यादीवर दबाव टाकण्यात आला होता.
स्वाक्षरीस नकार दिल्यानंतर आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिस अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून न्यायालयात अर्ज केल्यास मोक्का प्रकरणातील कारवाईत फायदा होईल, असा विश्वास आरोपींनी व्यक्त केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, जेलमधून सुटण्याच्या १५ दिवस आधी आरोपींनी त्याला एकटे गाठून खाली पाडले. दीपक लोंढेने पाय धरून ठेवले.
हर्षद पाटणकरने गळा दाबून, 'तुला जिवानिशी ठार मारतो' अशी धमकी दिली होती. जिवाच्या भीतीपोटी संबंधित अर्जावर स्वाक्षरी केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या घटनेनंतर आरोपींनी स्वाक्षरी केलेल्या कागदाचा वापर करीत विविध ठिकाणी तक्रारी व अर्ज पाठविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर या स्वाक्षरीचा गैरवापर करून न्यायालयात व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे बनावट अर्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या अर्जाद्वारे सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपूत व सुचित सोळुंके या अधिकाऱ्यांची बदनामी करणे, न्यायालयाची दिशाभूल करणे आणि सुरू असलेल्या गुन्ह्याच्या तपासावर दबाव निर्माण करण्याचा कट रचण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. अर्जामध्ये पोलिसांनी गोळीबार व मारहाण केल्याचे खोटे आरोप करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीला जामिनावर सुटका झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित अर्ज दाखवला. अर्जातील मजकूर पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तातडीने नाशिकरोड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर प्राथमिक चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करीत आहेत.
संशयित आरोपी सध्या कारागृहात
दीपक प्रकाश लोंढे, भूषण लोंढे व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे हे तिघेही मकोका गुन्ह्यात सप्टेंबर २०२५ तसेच सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर मार्च २०२६ पासून नाशिक रोड कारागृहात आहे. या घटनेतील दोन्हीही संशयित आरोपी हे सध्या कारागृहात आहे. वकील यतीश देसले याचा साखरपुडा असल्याचे समजते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यामुळे तोही फरार झाला आहे.