Fake Ghee Busted file
नाशिक

Fake Ghee Busted | नाशिकरोड परिसरात बेकायदेशीर बनावट तूप तयार करणारा कारखाना उघड; 35 किलो तूप जप्त

Fake Ghee Busted | नाशिकरोडला बनावट तुपाचा कारखाना उघड

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

शिंदेगाव येथील गौतमनगर भागात बेकायदेशीरपणे बनावट तूप तयार करणाऱ्या एका अड्ड्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेगाव येथील गौतमनगर भागातील विजय जाधव यांच्या खोलीत सतीश गिरी (२८) हा तरुण भाड्याने राहत होता. या बंद खोलीत मोठ्या प्रमाणावर बनावट तूप तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्या अनुषंगाने अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला.

संशयास्पद खोलीचे कुलूप तोडून आत झडती घेतली असता पथकाचे डोळे चक्रावले. खोलीमध्ये स्टेनलेस स्टीलच्या डब्यांमध्ये सुमारे ३५ किलो बनावट तूप आणि १५ किलो सुट्टे वनस्पती फॅट मिळून आले.

संशयित सतीश गिरी हा अस्सल तुपाच्या नावाखाली वनस्पती फॅटची (डालडा) सर्रास भेसळ करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. डब्यातील तयार तुपात साधारण ४ ते ५ किलो वनस्पती फॅट मिसळले जात होते. हे भेसळयुक्त तूप नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रतीक पुरुषोत्तम भड (३०) यांनी याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सतीश गिरी (रा. शिंदेगाव, गौतमनगर, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत जप्त करण्यात आलेले तूप आणि वनस्पती फॅटचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT