Nashik Water Crisis | नाशिककरांवर 25 टक्के पाणीकपात संकट pudhari photo
नाशिक

Nashik Water Crisis | नाशिककरांवर 25 टक्के पाणीकपात संकट

Nashik Water Crisis | मनपाची मागणी ७,३७० दलघफू. मात्र, केवळ ५,५०० दलघफू देण्याची जलसंपदाची तयारी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकची धरणे काठोकाठ भरलेली असताना, नाशिककरांवर पाच-दहा नव्हे, तर तब्बल २५ टक्के पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे. आगामी वर्षासाठी नाशिककरांना पिण्यासाठी ७,३७० दशलक्ष घनफूट, तर सिंहस्थासाठी ६३५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी महापालिकेने नोंदवली होती.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २९) पार पडलेल्या पाणी आरक्षण बैठकीत जलसंपदा विभागाने नाशिककरांना पिण्यासाठी ५,५०० दशलक्ष घनफूट व बाष्पीभवनाच्या दरासह ६,३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्याची तयारी दर्शविल्यामुळे आगामी काळात नाशिककरांवर मोठे जलसंकट कोसळण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री महाजन यांच्या निर्णयाकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणांची मालकी जलसंपदा विभागाकडे असल्यामुळे दरवर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी धरणांमधील पाणी आरक्षण निश्चित केले जाते.

यंदा नाशिककरांना पिण्यासाठी गंगापूर धरणातून ५,४४८ दलघफू, मुकणेतून १,७०० दलघफू व दारणातून २३० दलघफू अशा प्रकारे एकूण ७,३७० दलघफू पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी महापालिकेने केली होती.

दिवाळीनंतर १० टक्के पाणीकपात अटळ

  • राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १० टक्के पाणीकपातीचे धोरण शासनाने घेतले आहे. त्यासंदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

  • नाशिक महापालिकेने मात्र पाणीकपातीची अंमलबजावणी न केल्याने पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जलसंपदा अधिकाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केला गेला.

  • नाशिककरांची ६५० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाण्याची मागणी असताना, पायाभूत सुविधांच्या कामामुळे ६०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असल्यामुळे आधीच कमी पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत.

  • गंगापूर धरण थेट जलवाहिनी, बारा बंगला डब्ल्यूटीपी, निलगिरी बागेतील जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीगळती कमी होईल, त्यावेळी पाणीकपात करणे शक्य होईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

  • मात्र, शासनाच्या कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागेल, असे पालकमंत्र्यांकडून सांगण्यात आल्यानंतर दिवाळीनंतर पाणीकपातीची अंमलबजावणी करू, असे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले.

महापालिकेने केलेल्या मागणीच्या तुलनेत कमी पाणी आरक्षण मिळत असल्यामुळे उपलब्ध होणारे पाणी आरक्षण ३१ जुलैपर्यंत पुरवायचे ठरल्यास, नाशिककरांना २५ टक्के पाणीकपात करावी लागण्याची शक्यता आहे. आता पालकमंत्री महाजन यांनी या संकटातून नाशिककरांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT