जुने नाशिक : वातावरणातील गारवा व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरला आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घशाचा संसर्ग अशी लक्षणे असलेल्या आजाराने शहरातील रुग्णालये, दवाखाने ओसंडून वाहत आहेत. जुन्या नाशकातील महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांची अक्षरश: रांग लागल्याचे चित्र आहे. दररोज साडेचारशेवर रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असल्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव शहरात कायम असताना व्हायरल इन्फेक्शनची साथ नाशिककरांना त्रासदायक ठरली आहे. हिवाळा सुरू झाल्यामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा या आजाराच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरला आहे. जंतुसंसर्गातून न्यूमोनियासारख्या आजाराचा धोका बळावला आहे. तापसदृश आजाराच्या रुग्णांमध्येदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसोबतच खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची गर्दी दिसू लागली आहे. लहान मुले, वृद्ध व रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना साथीच्या आजाराची लागण लवकर होत असते. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारांमध्येही वाढ झालेली आहे. श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दररोज सुमारे दोनशे रुग्णांवर उपचार केले जातात. व्हायरल इन्फेक्शनच्या साथीनंतर दररोजची रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. यात ज्येष्ठांबरोबरच बालरुग्णांचाही समावेश आहे.