नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणाऱ्या आरोग्यसेविका महिला यांची अंतिम निवड यादी जाहीर झाली.
निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (दि. 24) अंतिम शिक्कामोर्तब केल्यानंतर 597 कर्मचाऱ्यांची निवड अंतिम झाली आहे. यात आरोग्यसेविका महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, एनटी, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, खुला आणि पेसा क्षेत्रातील जागांचा समावेश आहे. पात्र व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची अंतिम यादी जिल्हा परीषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली.
यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी (दि. 26) पदस्थापना होऊन नियुक्तिपत्र मिळणे अपेक्षित होते. मात्र, आरोग्य विभागांतर्गत रिक्त जागांची संख्या अतिरिक्त असल्याने या रिक्त जागा लक्षात घेऊन पदस्थापना देण्याचे काम गुरुवारी दिवसभर आरोग्य विभागात सुरू होते. त्यासाठी जिल्ह्यातील एकूण रिक्त जागा, तालुकानिहाय रिक्त जागा, पेसा यांचा अभ्यास करून, पदस्थापना द्यावयाची असल्याने काहीसा अवधी लागणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शुक्रवारी (दि. 27) पदस्थापना अंतिम केलेले नियुक्तिपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे जातील. त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नियुक्तिपत्र ऑनलाइन पद्धतीने ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. सुधाकर मोरे यांनी सांगितले.