नाशिक : जिल्हा परिषद मालेगाव विभागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आय जीनियस अबॅकस अकॅडमीतर्फे राबविण्यात आलेला अबॅकस प्रशिक्षण उपक्रम यशस्वी ठरला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन महिन्यांपासून मालेगाव तालुक्यातील २० हून अधिक गावांमध्ये अबॅकसचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. प्रशिक्षण समारोपप्रसंगी झालेल्या जिल्हास्तरीय परीक्षेत एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
विद्यार्थ्यांनी २० मिनिटांत १०० गणित प्रश्न सोडवले. सौंदाणे केंद्रात झालेल्या या परीक्षेला मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मालेगाव तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते. भुसे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अबॅकस या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमधील तळागाळातील विद्यार्थ्यांचे गणित सुधारेल. त्यांना गणिताची आवड निर्माण होईल आणि गणिताची भीती पूर्णपणे नाहीशी होईल. याच मुलांमधून भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम विद्यार्थी तयार होतील.