nashik zilla parishad  
नाशिक

Nashik Zilla Parishad | ठेकेदारांना जिल्हा परिषदेत नो एन्ट्री? फाइल हातात दिसल्यास कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

Nashik Zilla Parishad | सरकारी फायलींच्या हाताळणीवरून नाशिक जिल्हा परिषदेत खळबळ; कर्मचाऱ्यांना नोटीस

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रशासकीय शिस्त धाब्यावर बसवून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे डावलून थेट फायली हातात घेऊन फिरणाऱ्या ठेकेदारांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रतिभा संगमनेरे यांनी चांगलाच दणका दिला आहे.

'कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणाच्याही हातात कार्यालयीन फाइल आढळल्यास, संबंधित कर्मचाऱ्याला थेट निलंबित केले जाईल,' असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

जि. प. नवीन सुसज्ज इमारतीत स्थलांतर झाल्यानंतरही प्रशासकीय नियमांना केराची टोपली दाखवित ठेकेदार स्वतःच फायली घेऊन थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात स्वाक्षरीसाठी धडकत आहेत. एका ठेकेदाराने तर कहरच केला. संपूर्ण फाइल आणण्याऐवजी केवळ फाइलमधील ठराविक कागद हातात घेऊन, तो थेट डॉ. संगमनेरे यांच्यासमोर स्वाक्षरीसाठी उभा राहिला होता.

'कोणतीही कागदपत्रे नसताना आणि अर्धवट माहितीच्या आधारे अशा सुट्ट्या कागदांवर स्वाक्षरी करायची तरी कशी.' असा प्रश्न करीत संगमनेरे यांनी ठेकेदाराला सुनावले आणि दालनातून बाहेरचा रस्ता दाखविला. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यासमोरच घडला. हा प्रकार शांत होतो न होतो, तोच अवघ्या पाच मिनिटांत दुसरा एक ठेकेदार अशाच प्रकारे परस्पर फाइल घेऊन दालनात दाखल झाला.

एकापाठोपाठ दोन ठेकेदारांकडून घडलेल्या या प्रकारामुळे संगमनेरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी तत्काळ बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघाडणी करीत संबंधितांना 'कारणे दाखवा' नोटीस बजाविण्याचे आदेश दिले. यापुढे जर अशा प्रकारे ठेकेदारांमार्फत फाइल समोर आली, तर कोणतीही गय न करता, संबंधित कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन केले जाईल, अशी तंबीही दिली आहे.

'स्वतंत्र निविदा सेल'

बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार कायमचा मोडीत काढण्यासाठी आणि फायलींचा अनावश्यक प्रवास रोखण्यासाठी प्रशासनाने आता ठोस पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या तिन्ही बांधकाम विभागांची निविदा प्रक्रिया एकाच छताखाली राबविण्यासाठी स्वतंत्र 'निविदा सेल' निर्माण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

हा सेल कार्यान्वित झाल्यास, सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी पार पडेल, त्यामुळे फायली हाताळणीत पारदर्शकता येईल आणि प्रशासकीय कामात होणारा ठेकेदारांचा हस्तक्षेप पूर्णपणे थांबण्यास मदत होणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT