नाशिक : जिल्हा परिषदेतील वित्त विभागात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. १७) सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ पकडले. या दोघा संशयितांना शुक्रवारी (दि. १८) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही रविवारपर्यंत (दि. २०) पोलिस कोठडी सुनावली आहे.
किरण रंगनाथ दराडे (कनिष्ठ लेखाधिकारी) व सचिन प्रभाकर पाटील (कनिष्ठसहायक) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिक्षकांनी तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून विभागाने सापळा रचला. तक्रारदारासह इतर १७ शिक्षकांच्या वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकाऱ्यांकडे सादर करून त्यांच्याकडून वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात संशयितांनी १२ हजार ६०० रुपयांची लाच मागितली. पंचासमोर दोघा संशयितांनी तडजोड करीत ११ हजार रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. तसेच संशयित दराडे याच्या सांगण्यावरून पाटील याने लाचेची रक्कम स्विकारली. दोघांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयितांच्या घरझडतीत काही आढळून आले नसल्याचेविभागाने सांगितले. तसेच दोघांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी आणि गुन्ह्याचा तपास करण्यासाठी न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलिस कोठडी घेतल्याचे विभागाने सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, प्रमाेद चव्हाणके, संदीप वणवे यांनी ही कारवाई केली.