झिका व्हायरस  file photo
नाशिक

Nashik Zika Virus | धक्कादायक | नाशिक महापालिकेने दडवला 'झिका' रुग्ण

संगमनेरच्या ६६ वर्षीय वृध्दावर नाशिकमध्ये उपचार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुणे शहरात 'झिका'च्या संसर्गाने अवघ्या राज्यभरात खळबळ माजली असताना पुण्याआधीच नाशिकमध्ये 'झिका'संसर्गित रुग्ण दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संगमनेर येथील एका ६६ वर्षीय वृध्दास झिकाची लागण झाली होती. या रुग्णावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार होऊन तो घरी परतला आहे. यासंदर्भातील माहिती संबंधित रुग्णालयाकडून महापालिकेला कळविण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने झिकासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णाची माहिती दडवून ठेवली. यामुळे झिकाचे संकट गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरात झिकाचा रुग्ण नसल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून केला होता. प्रत्यक्षात पुणे शहराआधीच नाशिकमध्ये संगमनेरच्या एका रुग्णाचा 'झिका'चा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक आणि तितकीच गंभीर माहिती आता समोर आली आहे. सदर रुग्णाला 'झिका'ची लक्षणे आढळल्यानंतर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर हा रुग्ण आठवड्याभरापूर्वीच सुखरुप घरी परतला आहे. सदर रुग्णाबाबतची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला वेळीत कळविण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने उपाययोजना करणे गरजेचे होते. शासकीय यंत्रणांना त्याबाबतची माहिती कळविणे आवश्यक होते. परंतू महापालिकेने या रुग्णाची माहिती दडवून ठेवल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये झिकाचा संसर्ग झाला नसल्याचा महापालिका प्रशासनाचा दावाही आता कितपत खरा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यरत

स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांच्या संकटाने नाशिककरांना घेरले असताना आता 'झिका'ने नाशिककरांचे टेन्शन वाढविले आहे. पुण्यातील एरंडवणा परिसरामध्ये 'झिका'चे तीन रुग्ण आढळल्यानंतर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने राज्यभरातील सर्व महापालिकांना सतर्क केले आहे. नाशिक - पुणे दरम्यान प्रवाशांचे आवागमन पाहता पुण्यातील झिका आजाराचा संसर्ग नाशकातही बळावण्याचा धोका लक्षात घेत मनपाच्या आरोग्य यंत्रणेने साथरोग नियंत्रणासाठी 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' कार्यरत केली आहे.

'झिका'ची लक्षणे

डेंग्यूप्रमाणेच एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांपासून झिका विषाणूचा संसर्ग होतो. 'झिका'ने बाधित डास जेव्हा निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीला 'झिका'चा संसर्ग होतो. 'झिका'चा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे प्रामुख्याने आढळतात.

झिकाचा संसर्ग झालेला रुग्ण संगमनेर येथील रहिवासी होता. नाशिकमधील खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार झालेत. उपचारानंतर सदर रुग्ण सुखरूप घरी पोहोचला आहे. अहमदनगरच्या आरोग्य विभागाला यासंदर्भातील माहिती कळविली होती.
-डॉ. नितीन रावते, सहाह्यक वैद्यकीय अधिकारी, मलेरिया विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT