Kalaram Mandir Satyagraha 
नाशिक

Kalaram Mandir Satyagraha | 'चले जाव'च्या हाकेने पेटले होते नाशिक शहर; जनएल्गाराने धगधगला स्वातंत्र्याचा लढा

Kalaram Mandir Satyagraha | विद्यार्थ्यांनी ब्रिटिशांविरोधात फुंकले होते रणशिंग!

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे
हातात शस्त्र नव्हते... ब्रिटिशांच्या प्रचंड सत्तेशी लढण्यासाठी आधुनिक साधने नव्हती... पण मनात स्वातंत्र्याची ज्वाला होती! महात्मा गांधींच्या एका हाकेने देशभर पेटलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाची धग नाशिकपर्यंत पोहोचली आणि नाशिकच्या 'जेन झी'ने ब्रिटिश सत्तेविरोधात रणशिंग फुंकले. नेत्यांना अटक झाली, दडपशाही वाढली, तरी आंदोलन थांबले नाही.

विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून लढ्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आज पाहता पाहता या आंदोलन जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर त्या काळाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
१९४२ चा 'चले जाव'चा लढा हा नाशिकच्या स्वातंत्र्यसंग्रामातील असा अध्याय आहे, ज्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त एल्गार, पंचवटीतील संघर्ष आणि हजारो नागरिकांचा जनाक्रोश एकाच वेळी पाहायला मिळाला.

८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना भारत सोडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. 'करेंगे या मरेंगे'चा मंत्र देशभर पोहोचला. दुसऱ्याच दिवशी त्याचे पडसाद नाशिकमध्ये उमटले.

९ ऑगस्टला शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला. शिंपी नावाच्या तरुणाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात कोणताही मोठा नेता त्यांच्यासोबत नव्हता. विद्यार्थ्यांनी स्वतःच आंदोलनाची मशाल हाती घेतली होती.
ब्रिटिश प्रशासनाने शिंपी यांना अटक केली. मात्र, एका तरुणाला अटक करून आंदोलनाची धग विझविणे शक्य नव्हते. उलट अटकेमुळे संताप अधिकच वाढला. निदर्शने आणि दगडफेकीमुळे नाशिकमधील वातावरण तापले.

गद्रे, खाडिलकर आणि आर. एन. चौधरी यांच्यासह काही कार्यकर्त्यांनाही अटक झाली. १० ऑगस्ट १९४२ रोजी पंचवटीत दंगल उसळल्याची नोंद आहे. जमावाने पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला. दगडफेक झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यानंतर जमाव पांगला. मात्र, ११ ऑगस्टला तीन हजार नाशिककर रस्त्यावर उतरले. वातावरण चिघळले आणि जमावाकडून दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दोघे जखमी झाल्याची नोंद आहे.

नाशिकच्या मातीत क्रांतीची बीजे आधीच रुजली

१९४२ मध्ये नाशिक अचानक पेटले नव्हते. या भूमीवर ब्रिटिशविरोधी क्रांतिकारक विचारांची बीजे अनेक वर्षांपूर्वी रुजली होती. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाने स्वातंत्र्याची संकल्पना केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरती मर्यादित नसून सामाजिक न्यायाशी जोडली गेली.

भगूरचे विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तरुणांना संघटित करण्यासाठी 'मित्रमेळा' स्थापन केला. पुढे याच चळवळीचे रूपांतर 'अभिनव भारत' या संघटनेत झाले. १९०९ मध्ये नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एम. टी. जॅक्सन यांचा अनंत कान्हेरे यांनी केलेला वध हा नाशिकच्या क्रांतिकारक इतिहासातील सर्वाधिक गाजलेला अध्याय ठरला.

नेते तुरुंगात; पण 'जेन झी' थांबली नाही

'भारत छोडो' आंदोलनाची सर्वात मोठी ताकद ही होती की, ब्रिटिशांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक केली तरी जनआंदोलन थांबले नाही. नाशिकमध्येही विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी आंदोलनाची धुरा स्वतःच्या हातात घेतली.

मोर्चे, निदर्शने, दगडफेक आणि ब्रिटिश सत्तेच्या दळणवळण यंत्रणेला लक्ष्य करण्याचे प्रकार घडत राहिले. टेलिफोनच्या तारा तोडणे, खांब उखडणे अशा घटनांमध्ये वामनराव यार्दी यांना जबाबदार धरण्यात आल्याचा संदर्भ आहे. नाशिकमधील ही चळवळ पुढील काळात विविध स्वरूपात सुरू राहिली.

धग स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम

९ ऑगस्टला विद्यार्थ्यांनी रणशिंग फुंकले... १० ऑगस्टला पंचवटीत जनक्षोभ उसळला... ११ ऑगस्टला तीन हजार नाशिककर रस्त्यावर उतरले... आणि त्यानंतर वामनराव यार्दी, काकासाहेब गद्रे, डॉ. खाडिलकर, गोविंदराव देशपांडे, ओढेकर, दत्तात्रेय काळे, पी. आर. कुलकर्णी, वि. ग. केळकर, कोल्हाळकर, कोरे, खुशालसिंग, नारायणसिंग, अनंत गडकरी, यशवंत गायकवाड, विश्वनाथ गायधनी, गुजराथी, डॉ. गोगटे, गोसावी, चव्हाण, चंद्रात्रे, जानोरकर, जोशी, टकले, डोंगरे, तेली, देवरे, पिंगळे, पुरे, शहाबुद्दीन, शेलार, सहस्रबुद्धे यांनी आंदोलनाची धग स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम ठेवल्याची नोंद दस्तऐवजात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT