सुरगाणा : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतप्त तरूणाने युवतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (दि.२७) सुरगाणा तालुक्यातील पोहाळी येथे उघडकीस आली. तरूणाला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे सुरगाणा तालुका हादरला आहे. सुमन चंदर दळवी (वय २७) असे खून झालेल्या युवतीचे नाव असून याप्रकरणी भरत लक्ष्मण भोये याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील घोडांबे येथील भरत भोये या तरूणाचे सुमन हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्याने अनेकवेळा तिला प्रेमसंबंध ठेवण्याचा आग्रह केला. त्याला तिने नकार दिल्याने याचा राग मनात धरून त्याने २४ मार्च रोजी तिच्या डोक्यावर ठणक वस्तूने प्रहार करून तिचा खून केला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह पोहाळी शिवारातील अशोक दळवी यांच्या शेतातील विहिरीत फेकला. ही घटना २४ मार्चला पहाटे ५ च्या दरम्यान घडली असून गुरूवारी (दि.२७) सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी भेट दिली. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर मृतदेह विहिरीतून काढून पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी तरूणाला अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे हे करीत आहेत. गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.