नाशिक

विजांच्या कडकडाटासह येवल्यात बेमोसमी पावसाची दमदार हजेरी ; वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली

unseassonal rain nashik | उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

येवला : गेल्या महिनाभरापासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या येवला तालुक्यात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दुपारपर्यंत कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही वेळातच तालुक्यात अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्याचा वेगही मोठा असल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

सावरगाव – पाटोदा मार्गावर ठाणगावजवळ मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे प्रयत्न केले. तालुक्यातील ग्रामीण भागातही वादळी पावसाचा जोर पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून तापमान ४२ अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त झाले होते. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आज जास्त लग्न तिथी असल्याने शेतकऱ्यासह वऱ्हाडी मंडळीची चांगलीच धावपळ उडाली.

शेतातील काढून ठेवलेला कांदा, जनावरांसाठी तयार करून ठेवलेली मक्याची कुट्टी,उन्हाळी मका अचानक आलेल्या पावसामुळे ओले झाले.आधीच शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही त्यातच आता आलेल्या पावसाने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सुलतानी संकटाबरोबर आता आस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. धुळगाव , भाटगाव, साताळी,भिंगारे,रायते, चिंचोडी महालखेडा, आदींसह विविध गावात पावसाने हजेरी लावली. सावरगाव पाटोदा दरम्यान झाड पडले. ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला विखरणी उपकेंद्रातुन रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.शहरात मनमाड रोडवर विजेची तार अचानक रस्त्यावर पडल्याने मोठे लोळ दिसून आले बराच वेळ या भागातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT