नाशिक

Sprinkler Irrigation| "कोवळ्या पिकांना जीवदान देण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार! येवल्यात दमदार पावसासाठी शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा"

Sprinkler Irrigation| दमदार पावसासाठी येवल्यात शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा

पुढारी वृत्तसेवा

येवला : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. खऱ्या मात्र आता पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पावसाअभावी सध्या खरिपाची कोवळी पिके सुकू लागल्याने बळीराजाच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे.

दमदार पावसासाठी येवल्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. कोवळ्या पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकरी आता तुषार सिंचनाचा वापर करताना दिसत आहेत. तालुक्यात मका, सोयाबीन, तूर, बाजरी यांसारख्या विविध पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून कडक ऊन पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होत असल्याने नुकतेच अंकुरलेली कोवळी पिके जळण्यापासून वाचवण्यासाठी शेतकरी उपलब्ध पाण्याचा वापर करून तुषार आणि ठिबक सिंचनाचा अवलंब करत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी उपलब्ध आहे ते पिकांना जीवदान देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.

सुरुवातीच्या पावसावर बियाणे आणि खते आणून पेरणी केली. अपेक्षेप्रमाणे पिके छान उगवली पण आता कडक उन्हामुळे ती करपू लागली आहेत. पुढील चार-पाच दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. सध्या संपूर्ण येवला तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होत असले तरी पाऊस मात्र हुलकावणी देत आहे.

त्यामुळे आता केवळ दमदार पावसाची प्रतीक्षा संपूर्ण तालुक्याला आहे. जमिनीखालील भूजल पातळीत फारशी वाढ झालेली नाही. तालुक्यातील बहुतांश विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत अजूनही अपेक्षित वाढ न झाल्यामुळे सिंचनाचा प्रश्न कायम आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे? "यंदा मृग नक्षत्र कोरडं गेल्यानंतर कसाबसा पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पै-पै गोळा करून कर्ज काढून पेरण्या उरकल्या. पण आता महिना उलटत आला तरी पावसाने पुन्हा एकदा दीर्घ ओढ दिली आहे. त्यामुळे कोवळी पिके डोळ्यांदेखत करपू लागली आहेत."
भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती, येवला
"सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पेरणी केलेली पिकेही छान उगवली. पण आता पावसाने दगा दिला तर सगळं मातीमोल होईल. वरुणराजाने आता लवकर कृपा करावी एवढीच प्रार्थना आहे."
बाबासाहेब रोकडे, शेतकरी, अंदरसूल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT