नाशिक

Nashik news | लाच नाकारल्याने पोलिसांनी लष्कराचे साहित्य असलेला ट्रक पेटवला? येवल्यात खळबळ

नो एन्ट्री'चे कारण सांगून पोलिसांनी ट्रक चालकाकडे केली पाच हजार रुपयांची लाचचे मागणी

पुढारी वृत्तसेवा

येवला : पुणे-इंदूर महामार्गावर येवला टोलनाक्याजवळ शुक्रवारी (दि. १०) एका आयशर ट्रकने भीषण पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात नसून, वाहतूक पोलिसांनी लाचेची मागणी पूर्ण न झाल्याने रागाच्या भरात ट्रक पेटवून दिल्याचा गंभीर आरोप ट्रक चालकाने केला आहे. या आगीत भारतीय लष्कराचे (Army) साहित्य जळून खाक झाले असून, पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पंजाब येथील ट्रक चालक करतारसिंग हे पुण्याहून भटिंडा येथे लष्कराचे सामान घेऊन जात होते. येवल्यातील पिंपळगाव टोलनाक्याजवळ वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले. 'नो एन्ट्री'चे कारण सांगून पोलिसांनी ३० हजार रुपयांचे चलन फाडण्याची भीती घातली आणि प्रकरण मिटवण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. चालकाने सर्व कागदपत्रे वैध असल्याचे सांगत लाच देण्यास स्पष्ट नकार दिला.

सिगरेटच्या ठिणगीने घात केला

प्रत्यक्षदर्शी आणि चालकाच्या म्हणण्यानुसार, वादावादी सुरू असतानाच एका पोलीस कर्मचाऱ्याने आपली पेटती सिगरेट ट्रकच्या दिशेने फेकली. ट्रकमध्ये एसी गॅसचे सिलिंडर असल्याने सिगरेटच्या ठिणगीमुळे क्षणार्धात भीषण स्फोट झाला. आगीचे गोळे आणि गॅसच्या बाटल्या हवेत उडाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. धक्कादायक म्हणजे, आग लागताच घटनास्थळी असलेले ४-५ पोलीस कर्मचारी तिथून पळून गेल्याचे चालकाने सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ट्रक चालकाने आपली कैफियत मांडल्यानंतर भुजबळांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी साळुंके यांच्याशी संपर्क साधून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी स्थानिक प्रशासन अधिक तपास करत असून, पोलिसांवरील या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT