Nashik illegal hospital sealed Pudhari
नाशिक

Nashik illegal hospital sealed: येवल्यात आरोग्य प्रशासनाची धडक कारवाई; हॉस्पिटल सील, विनापरवाना औषधसाठा जप्त

येवला तालुक्यातील बोकटे गावात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कथित ‘डॉ. रॉय’ यांच्या हॉस्पिटलवर आरोग्य विभागाने धडक कारवाई केली

पुढारी वृत्तसेवा

येवला : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोर आणि नियमबाह्य आस्थापनांविरोधात विशेष मोहीम हाती घेत जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना इशारा दिला असतानाच, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बोकटे गावात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कथित ‘डॉ. रॉय’ यांच्या हॉस्पिटलवर आरोग्य विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना औषधसाठा जप्त करण्यात आला असून हॉस्पिटल सील करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी (दि. २) दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत प्रशासनाने बोकटे गावातील हॉस्पिटलची तपासणी केली. हॉस्पिटलच्या दर्शनी भागावर लावलेल्या फलकावर ‘डॉ. रॉय’ या नावासमोर कोणतीही शैक्षणिक पदवी नमूद नसल्याचे आढळून आले. संबंधित व्यक्ती आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्यांचे विकार आणि इतर आजारांवर हमखास उपचार करतो, असा दावा करून रुग्णांना लेबल नसलेल्या गोळ्या, औषधे व इंजेक्शन देत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद तारू यांना आलेल्या निनावी फोनवरून या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने विशेष पथकासह कारवाई केली. छाप्यात अवैध औषधसाठा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या औषधांच्या नमुन्यांची पडताळणी करण्यासाठी ती नाशिक येथे पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. तारू यांनी दिली.

आरोग्य विभागाच्या या धडक कारवाईनंतर परिसरातील अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांपासून बोकटे गावात हॉस्पिटल चालविणारे कथित ‘डॉ. रॉय’ कारवाईनंतर फरार झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.

ग्रामस्थांच्या निनावी तक्रारीनंतर कारवाई

ग्रामस्थांकडून निनावी फोनद्वारे तक्रार प्राप्त झाल्यानंतर येवला तालुका आरोग्य विभागाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. गरीब व गरजू रुग्णांची फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष पथकाच्या माध्यमातून दवाखान्यावर छापा टाकत कारवाई केली.

"आम्हाला निनावी कॉल प्राप्त झाला होता. त्याची दखल घेत आमच्या पथकाने बोकटे येथील ‘डॉ. रॉय’ यांच्या हॉस्पिटलची तपासणी केली. तपासणीत अनधिकृत औषधसाठा आढळून आल्याने धडक कारवाई करत हॉस्पिटल सील करण्यात आले."
डॉ. आनंद तारू, तालुका आरोग्य अधिकारी, येवला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT