देवळा (नाशिक) : खर्डे ता.देवळा येथे श्रीराम नवमी निमित्त आयोजित यात्रौत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यामध्ये कुस्त्यांच्या दंगलीत अंतिम मानाची कुस्ती चांदवड येथील गौरव देवरे या पैलवानाने जिंकली. त्याबद्दल त्याला रोख स्वरूपात अकरा हजार एक रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यात्रेनिमित्त (दि .८ ) पर्यंत तीन दिवस विविध कार्यक्रम झाले. दि ३० रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे मंदिरात विधिवत पूजा करून सकाळी श्रीराम मंदिरावर मांडव टाकून शनिवार (दि.5) परायण व संगीत रामायण सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला शनिवार (दि.5) रोजी रात्री शिवव्याख्याते प्रा. यशवन्त गोसावी यांचे शिव व्याख्यान झाले रविवार (दि.6) रोजी श्रीराम नवमी निमित्त राम जन्मोत्सव सोहळा, सायंकाळी राम रथाची भव्य मिरवणूक, रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेल्या 'छावा' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला. सोमवार (दि.7) रोजी रात्री भारुडाचा कार्यक्रम झाला. बुधवार (दि.8) रोजी दुपारी ३ वाजता भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली.
लहान व युवा गटातील कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या. लहान वयोगटातील सहभागी होणाऱ्या पैलवानांना प्रोत्साहन देण्यात आले तर अंतिम मानाची कुस्ती चांदवड येथील गौरव देवरे या पैलवानाने जिंकली. यात्रा कमिटीच्या वतीने अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते मानाच्या कुस्तीला रोख स्वरूपात अकरा हजार एक रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यात्रेसाठी विविध दुकाने थाटली होती. मंगळवार (दि.8) रात्री ९ वाजता शाहीर सुरेश जाधव यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाने यात्रौत्सवाची सांगता झाली. ग्रामस्थ ,भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. यात्रेसाठी यात्रा कमिटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस निरीक्ष सार्थक नेहेते यांनी भेट देऊन शांततेत पार पडलेल्या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.