नाशिक : गेल्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्यातील सर्व विक्रम मोडीत काढणारी थंडी चालू आठवड्यात अचानक गायब झाली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री उकाडा असे विचित्र वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता पुन्हा थंडी परतायला लागली आहे. कमाल तापमानात सातत्याने घसरण होत असल्याने, थंडी अंगाला झोंबत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिककरांना उबदार कपडे परिधान करून वावरावे लागत आहे.
गेल्या आठवड्यात किमान तापमान ८ अंशापर्यंत घसरल्याने हाडे गोठविणाऱ्या थंडीचा नाशिककरांना अनुभव घ्यावा लागला. मात्र, चालू आठवड्याच्या प्रारंभी अचानकच थंडी गायब झाली. किमान तापमान थेट १७.२ अंश सेल्सिअसवर गेल्याने, तसेच कमाल तापमानातही मोठी वाढ झाल्याने नाशिककरांना दिवसभर आणि रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागला. दरम्यान, आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमानात पुन्हा घसरण नोंदविली गेल्याने, पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी किमान तापमान १५.१ तर कमाल तापमान २९.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. दिवसभर उन्हाचा चटका आणि सायंकाळी झोंबणारी थंडी असे काहीसे वातावरण निर्माण झाल्याने, नाशिककरांना पुन्हा एकदा हुडडुडी भरली आहे. दरम्यान, उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातील सर्वच भागात थंडीचा कहर बघावयास मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
थंडावलेल्या बाजाराला पुन्हा उब
थंडीचा कडाका वाढल्याने उबदार कपड्यांच्या बाजारात मोठी वर्दळ दिसून येत होती. मात्र, थंडी गायब झाल्यानंतर नाशिककरांनी उबदार कपडे खरेदीकडे पाठ फिरवली होती. यंदाचा हिवाळा हा इतर वर्षांच्या तुलनेत अधिक तीव्र असल्याचे अगोदरच हवामान विभागाने स्पष्ट केल्याने, विक्रेत्यांनी देखील लाखो रुपयांची गुंतवणूक करीत उबदार कपड्यांचा स्टॉक भरून ठेवला आहे. आता थंडी पुन्हा परतल्याने, नाशिककरांची पावले उबदार कपडे खरेदीकडे वळायला लागली आहेत.