लासलगाव (नाशिक ) : राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा थेट परिणाम वाइन उद्योगावर दिसत आहे. द्राक्ष उत्पादनात ६० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज नाशिक वाईन असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाचपाटील यांनी व्यक्त केला. परिणामी राज्यातील वाइन उत्पादनात जवळपास १ कोटी लिटरची घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादन कमी झाल्याने यंदाच्या हंगामात वाइनचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठीच्या सेलिब्रेशन्समध्ये ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
राज्यात दिवाळीपर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा व सांगली या द्राक्ष उत्पादनाच्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे आणि काही ठिकाणी झालेल्या पूरस्थितीमुळे द्राक्षबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वाइनसाठीची द्राक्षशेती १० हजार हेक्टरवरून ६ हजार हेक्टरपर्यंत खाली आली. त्यामुळे वाईन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
खाण्यासाठीच्या द्राक्षांपासूनही वाईन तयार केली जाते. द्राक्षबागेतील द्राक्षांची बाजारात विक्री झाल्यानंतर बागेत शिल्लक असलेल्या कमी प्रतीच्या द्राक्षांपासून वाईन निर्मिती होते. यंदा उत्पादनात होणारी घट, बाजारातील मागणी आणि बेदाणा निर्मितीसाठीची मागणी विचारात घेता वाईनसाठी द्राक्षांची उपलब्धता कमी राहील. वाईन उद्योगाकडून २० ते २५ रुपये किलो दराने द्राक्ष खरेदी होत होती. यंदा ४० ते ५० रुपये देऊनही वाईनसाठी द्राक्ष मिळणे कठीण आहे. परिणाम वाईन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
युरोपियन देशांतून मागणी
राज्यात सुमारे ३ कोटी लिटर वाईन निर्मिती होते. वाईनसाठीच्या द्राक्ष क्षेत्रात झालेली घट आणि खाण्याच्या द्राक्ष उत्पादनात होणारी घट पाहता एकूण वाईन निर्मितीत एक कोटी लिटरने घट होण्याचा अंदाज आहे. मागील वाईन शिल्लक असल्यामुळे सप्टेंबरपर्यंत वाईनचा तुटवडा भासण्याची शक्यता नाही. पण, वाईनच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यातून २५ हून जास्त देशांना वाईन निर्यात होते.
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा थेट परिणाम आता वाइन उद्योगावर दिसू लागला आहे. द्राक्ष उत्पादनात तब्बल ६० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे.प्रदीप पाचपाटील, अध्यक्ष, नाशिक वाईन असोसिएशन
वाईन उत्पादन घटणार
राज्यात दरवर्षी साधारण ३ कोटी लिटर वाइन उत्पादन होते. मात्र, यंदाच्या हंगामात द्राक्ष उपलब्धतेतील तुटवड्यामुळे जवळपास १ कोटी लिटरने उत्पादन घटण्याचा अंदाज उद्योग क्षेत्राकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोसळले आहे. वाइन उद्योगालाही त्याचा मोठा फटका बसला आहे.संजय गवळी, शेतकरी, खडकमाळेगाव
वाइनच्या किमतीत वाढ
उत्पादनात घट आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे वाइनची बाजारातील उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. सणासुदीचा काळ, विशेषतः नववर्षाच्या पार्टी, ईव्हेंट्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील मागणी लक्षात घेता दरवाढ जवळपास निश्चित मानली जात आहे.