नाशिक : जिल्ह्यातील बहुतांशी भागाला शनिवारी (दि.7) पावसाने झोडपून काढले. निफाड तालुक्यातील कसबे- सुकेणे येथे वीज पडून एक गाय ठार झाली, तर पेठ येथील निरगुडे गावात बैल आणि एक गाय ठार झाले. दरम्यान, रविवारी (दि.8) रोजी जिल्ह्याला 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
गत महिन्यात अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात दाखल झालेल्या मान्सूननेही चांगलाच धडाका लावला होता. त्यांनतर काही दिवस गायब झालेल्या पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले आहे. शनिवारी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात हजेरी लावली. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील सदाशिव जगन्नाथ शेवकर यांची गाय वीज पडून ठार झाली, तर पेठ तालुक्यातील निरगुडे येथे नामदेव देवजी थाळकर यांच्या शेतात वीज पडून एक बैल आणि एक गाय ठार झाली. निफाड आणि पेठ तहसील कार्यालयाने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. दरम्यान यलो अलर्टमुळे नागरिकांनी सावध राहून आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन हवामान विभाागाने केले आहे.