नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील काही भागांत उष्णतेचा रेड अलर्ट, तर काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने दाणादाण उडवून दिली आहे. नाशिकमध्येही मान्सूनपूर्व पावसाचे वारे वाहात असून, ढग दाटून येत असल्यामुळे कमाल तापमानात मोठी घसरण झाली आहे.
मात्र, किमान तापमानातील वाढ कायम असल्यामुळे नाशिककर उकाड्याने हैराण झाले आहेत. ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेल्या नाशिकच्या कमाल तापमानात सातत्याने घट होत आहे. कमाल तापमान ३५ अंशांवर आल्याने, उष्णतेची धग काहीशी कमी झाली आहे. त्यातच ढग दाटून येत असल्यामुळे नाशिककरांना ऊन-सावल्यांचा खेळ अनुभवायला येत आहे. दुसरीकडे किमान तापमानातील वाढ मात्र कायम आहे.
किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले जात असल्याने सायंकाळी, रात्री आणि पहाटेच्या सुमारास प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मान्सूनपूर्व पावसाचे वारे नाशिकमध्येही वाहात आहेत. रविवारी (दि. २४) शहरात सायंकाळच्या सुमारास वारे वाहात असल्यामुळे नाशिकच्या आकाशात धुळीचे धुके दाटल्याचे दिसले. याशिवाय ढग दाटून आल्याने, पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.