नाशिक : राज्याच्या विविध भागामध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून नाशिक जिल्ह्यात तसेच जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात गुरुवार (दि. 26) काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस तर शुक्रवारी (दि.27) काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, गारपीटीची शक्यताआहे. याबाबत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी अंदाज वर्तविला आहे.
राज्यात गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर राज्यातील काही शहरांचे तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. परंतु दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हिवाळ्याच्या थंडीत पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गायब होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. यामुळे राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुरूवारी (दि.26) व शुक्रवारी (दि.27) अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालन्यात पावसाची शक्यता आहे. तर बीड परभणी, हिंगोली आणि अकोल्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच अमरावती, बुलढाणा, वाशिम नाशिकमध्येही पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढणार असून 26 ते 28 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर वर्षाअखेरीस म्हणजे 30 डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढणार आहे.
मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. ढगाळ हवामानामुळे आधीच द्राक्षावरील फवारणी वाढली आहे यातच, गारपीट झाल्यास त्याचा फटका द्राक्षाला बसण्याची शक्यता आहे. तसेच विविध फळबागा, कांदा, गहू, हरभरा आदी रब्बी पिकांनाही गारपीटीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.