नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात रविवारी (दि.२९) चांदवड, सिन्नर तालुक्यात पावासाने हजेरी लावलेली असतानाच आगामी चार दिवस जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. चार दिवस जिल्ह्यात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि. ३१) जिल्ह्यासह घाट प्रक्षेत्रात गारपीट होण्याची शक्यता आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने जिल्ह्यासाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. सोमवार (दि. ३०) पासून गुरुवार (दि. २) पर्यंत ३ दिवसांसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
या काळात जिल्ह्यात तसेच घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मंगळवारी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, हवामान अधिक खराब राहण्याची शक्यता आहे.
५० ते ६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहून मोठ्या प्रमाणावर गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाजानुसार, हा अवकाळी पाऊस आणि गारपीट पिकांसाठी घातक ठरू शकतो. काढणीला आलेली पिके आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी.
काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. वीज कडाडत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे. घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे. सोसाट्याच्या वाऱ्यापासून स्वतःचा बचाव करावा, असा सल्ला इगतपुरीतील केंद्राने दिला आहे.