नाशिक : मागील काही दिवसांमध्ये दडी मारून बसलेला पाऊस जिल्ह्यात पुन्हा एकदा परतला असून, गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
दोन दिवसांत शहरात ४३.५, तर जिल्ह्यात ६८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच हवामान विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह ५० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
यंदा ७ मेपासून सुरू झालेला पाऊस मागील आठवडाभराचा अपवाद वगळता अजूनही जिल्ह्यात बरसत आहे. यंदा मान्सून जोरदार बरसणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, मे महिन्यात अवकाळी पावसाने सुरू केलेला कहर अद्यापही सुरूच आहे. तज्ज्ञांच्या मते, जिल्ह्यात अद्यापपर्यंत मान्सूनचे आगमन झाले नसून, आता बरसत असलेला पाऊस हा मान्सूनपूर्व आहे. कारण मान्सूनचा पाऊस हा वारा आणि विजांच्या कडकडाटासह बरसत नसून, सद्यस्थितीतील पाऊस वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह बरसत आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने जिल्हा व्यापला असून, दररोज पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने यापूर्वीच जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान, पाऊस समाधानकारक होत असला, तरी शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग लगेच सुरू करू नये, असा सल्लाही तज्ज्ञांकडून दिला जात आहे
मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस रात्रीच्या सुमारास जोरदार हजेरी लावत आहे. दोन्ही दिवस तासभराहून अधिक वेळ पाऊस पडल्याने, शहरातील रस्ते जलमय झाले होते. दरम्यान, दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सावली मिळत असली, तरी जमिनीतून उष्णता बाहेर पडत असल्याने, नागरिकांना उकाडा सोसावा लागत आहे.
यंदा मे महिन्यापासूनच पावसाने बरसण्यास सुरुवात केल्याने, बऱ्याच भागात महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे पूर्णपणे मार्गी लागले नसल्याचे चित्र आहे. परिणामी पावसाची एंट्री होताच, वीज गायब होत असल्याने, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास पाऊस कोसळत असल्याने, रात्री उशिरापर्यंत बत्तीगुल होत असल्याचे चित्र आहे.
विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह पाऊस काेसळत असल्याने, थेट मंत्रालयातूनच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडूून नागरिकांच्या मोबाइल संदेश धडकत आहेत. पुढील तीन ते चार तासांत जिल्ह्यातील काही भागांत ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले जात आहे.