नाशिक : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २२) गंगापूर धरणावर जलपूजन सोहळा गुपचूप उरकण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. जलपूजनाची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी एका राजकीय पदाधिकाऱ्याने स्मरण दिल्यानंतर प्रशासनाने हा सोहळा घाईघाईत उरकण्यात आला असून यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे.
शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत. गंगापूर धरणातून शनिवार, रविवारच्या पावसानंतर काही प्रमाणात विसर्गही सुरू आहे. दरवर्षी धरण भरल्यानंतर जलपूजनाची प्रथम महापौर शांतारामबापू वावरे यांच्यापासूनची परंपरा आहे. लोकप्रतिनिधींच्या राजवटीत महापौरांच्या हस्ते जलपूजन केले गेले. प्रशासकीय राजवटीत प्रशासकांच्या हस्ते जलपूजनाची परंपरा राखली गेली. यंदा गंगापूर धरण सप्टेंबरमध्येच भरले होते. परंतू प्रशासनाला जलपूजनाचे विस्मरण झाले. दरम्यान, विधानसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर आदर्श आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे जलपूजन सोहळ्यावर आचारसंहितेचे सावट पसरले होते. मंगळवारी (दि. २२) सकाळी अचानक महापालिकेचे प्रमुख अधिकारी गंगापूर धरणावर पोहोचले. यातील काही अधिकाऱ्यांना आपल्याला कशासाठी पाचारण करण्यात आले याचीदेखील माहिती नव्हती. याठिकाणी आयुक्त डॉ. करंजकर यांच्या हस्ते विधीवत जलपूजन झाले. गोदामातेला श्रीफळ, महावस्त्र अर्पण करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सोमवारी (दि. २१) एका राजकीय पदाधिकाऱ्याने गंगापूर धरणाची जलपूजनाची परंपरा खंडीत झाल्याची नाराजी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोलून दाखविली. त्यानंतर रात्रीतून जलपूजनाच्या तयारीसाठी सर्व यंत्रणा कामाला लागली. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जलपूजनाचा सोहळा गुपचूप उरकण्यात आला.
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे जलपूजन सोहळ्याविषयी प्रशासनाकडून कमालीची गुप्तता बाळगली गेली. यासंदर्भातील माहिती बाहेर पडल्यानंतर याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी कानावर हात ठेवले. काही अधिकाऱ्यांनी तर आमचे नाव घेऊ नका, असे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला.
---