देवळाली कॅम्प (नाशिक): अवकाळी पावसामुळे देवळाली व भगूर उपकेंद्रातून वारंवार वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दारणा नदीतून पूर्ण क्षमतेने पाण्याचे पंपिग होत नाही. परिणामी देवळाली कॅन्टोन्मेंट भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमितपणे होत असल्याने गेल्या तीन दिवसांपासून रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
देवळाली व भगूर सबस्टेशनमधून कॅन्टोनमेंट भागाला वीज पुरवठा होतो. परंतु गत पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळ आणि विजा कोसळण्याच्या प्रकाराने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दारणा नदीकिनारी बोर्डाच्या पाणीपुरवठा पंपिंग हाऊसमधून पुरेशा प्रमाणात पाणी उचलता येत नसल्याने कॅन्टोन्मेंट भागातील रहिवाशांना पुरविण्यात अडथळे येत आहेत. वीज पुरवठा पूर्ववत होताना फेज क्रम बदलला जातो. त्यामुळे बूस्टर मोटर विरुद्ध दिशेने फिरतात. परिणामी मोटार जळून जाते आणि त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पुरते कोलमलडले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी देवळाली आणि भगूर सबस्टेशनला अखंडित वीज पुरवठा करावा, फेज बदलण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून महावितरणकडे करण्यात आली. तसेच याबाबतची माहिती महानिर्मिती व महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आली.
सध्या आकाशातून धो धो पाऊस पडतो, रस्त्यावर पाण्यांचे पाट वाहत आहेत. परंतु देवळालीकरांना पिण्याचे पाणीच नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना उकाड्याने हैराण केले आहे.सुरेश कदम, रहिवाशी, नाशिक.