नाशिक : नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडतर्फे शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि जलकुंभावर स्काडा वॉटर मीटर प्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभावर स्काडा प्रणाली बसवली जाणार आहे.
शहरातील विविध ठिकाणी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी शनिवारी (दि. २२) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच, रविवारी (दि. २३) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र व विविध जलकुंभांवर स्काडा वॉटर मीटर प्रणाली बसविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे आदी देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यामुळे शनिवारी संपुर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रात संपुर्ण दिवसाचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही व रविवार (दि.२३) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.