नाशिक : आगार टाकळी परिसरातील ओझोन सोसायटीत पाणी सोडण्यासाठी महापालिकेच्या व्हॉल्वमनकडून टाळाटाळ केली जात असल्याने येथील रहिवाशी तहानलेले आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाने तत्काळ लक्ष घालून सोसायाटीत पूर्वीप्रमाणे पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सोसायटीत पाणी टंचाई का होत आहे. यामागे कोणाचा हात आहे. याचा शोध पालिकेने घ्यावा अशी देखील मागणी ओझोन सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे. (Residents are suffering due to low pressure water supply in various parts of the city even as the dams are filled with water)
यंदा वरुणराजाने नाशिकवर चांगलीच कृपा केल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी गंगापूर व दारणा ही धरणे 100 टक्के भरली. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र असे असूनही शहरातील विविध भागांमध्ये कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त आहेत. या समस्येविरोधात सिडकोमधील महिलांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता, तर जेल रोड परिसरातील महिलांनीही मोर्चा आणला होता. परंतु आगर टाकळी परिसरातील ओझोन सोसायटीत व्हॉल्व्हमनकडून पाणी सोडण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून केला जातोय. दरम्यान, ओझोन या सोसायटीमध्ये 150 ते 175 रहिवासी असून, दिवसाला साधारण ६५ हजार लिटर पाणी लागते. व्हॉल्व्हमनमुळे निम्मे पाणीदेखील उपलब्ध होत नाही. परिणामी रहिवाशांवर पैसे देऊन टँकर आणण्याची वेळ आली आहे. याकडे महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
यासंबंधी मनपा संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार केली असता, त्याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आयुक्त तुकाराम मुंढे असताना झाडून कामाला लागलेल्या प्रशासनावर वचकच राहिला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.