सिन्नर : सरदवाडी मार्गावरील उपनगरांत सणासुदीच्या दिवसांत आणि सणानंतरही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. नगर परिषदेची जलवाहिनी वारंवार फुटत असल्यामुळे परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सणासुदीच्या काळात पाण्याची गरज अधिक असतानाही जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा नियमित वेळेपेक्षा उशिरा केला जात होता. दिवाळीचा सण संपल्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झाला नसल्यामुळे उपनगरवासीय हैराण झालेले आहेत.
कडवा ते सिन्नर जलवाहिनी कडवा धरणाजवळ फुटली. त्यामुळे शहर, उपनगरांना होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. ऐन लक्ष्मीपूजनालाच पाण्यासाठी नागरिकांची वणवण झाली होती. नागरिकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असल्याने औद्योगिक वसाहतीकडून पाणी घेण्यात आले. जलकुंभात पाणी पडताच ही जलवाहिनीही फुटली. त्यामुळे पाणीपुरवठ्यात आणखीच खंड पडला. सद्यस्थितीत दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा पुन्हा तीन ते चार दिवसाआड झाला आहे.
धरणात मुबलक पाणी असताना शहराला पुरेसे पाणी मिळत नाही. अनेकदा वीजपुरवठ्यात समस्या येतात. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडतात. या नेहमीच्या कारणांनी उपनगरांतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी चेहेडी ते सिन्नर ही जुनी जलवाहिनी दोनदा फुटली होती. त्यामुळे शहरात पाणी देण्यासाठी कडवा जलवाहिनीचे पाणी वळवण्यात आले. त्यामुळे सरदवाडी मार्गावरील कमलनगर, ढोकेनगर, आश्विनाथनगर, साईबाबानगर, सरस्वतीनगर, संजीवनीनगर, शातीनगर, महालक्ष्मीनगर, उद्योगभवन, अयोध्यानगर, कर्पेनगर, वृंदावननगर, मॉडर्न कॉलनी या भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.