वणी (नाशिक) : येथील देशमुख कुटुंबात शतकानुशतके चालत आलेली धार्मिक परंपरा जपत पारंपरिक ‘चक्रपुजा’ मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. गणेश देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या या पूजेत कुटुंबीयांसह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीची आराधना केली.
नवरात्रोत्सवात चक्रपुजेची धूम
वणी व परिसरात सध्या नवरात्रोत्सवात चक्रपुजेची विशेष धूम सुरू आहे. चक्रपुजेतून आदिमायेचा जागर केला जातो. आदिमायाचा नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा उत्सव मानला जातो. खान्देशासह संपूर्ण जिल्ह्यात देवीला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चक्रपूजा केली जाते.नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत पाचव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या माळेला चक्रपूजा करण्याची परंपरा आहे.
बहुतेक कुटुंबात घटस्थापनेजवळच चक्रपूजा केली जाते, तर काही जण नवसपूर्ती म्हणून थेट गडावर जाऊन चक्रपूजा करतात. ही पूजा बुवा व बुराडी या यंत्रांवर केली जाते. कुटुंबातील परंपरेनुसार काही घरात दरवर्षी, तर काही ठिकाणी वर्षाआड किंवा तिसऱ्या वर्षी चक्रपूजा करण्याची प्रथा आहे.
चक्रपूजेसाठी लागणारे साहित्य
पाच किंवा अकरा ओंजळ तांदूळ, अकरा कणकेचे दिवे, नारळ, अकरा पुरणपोळ्या (मांडे), पुऱ्या, करंज्या, तसेच पेरू, सीताफळ, आंबे, चाफा, रामफळ, कापूर, उडीद, गुलाल आदींचा समावेश असतो. एक चक्र पांढऱ्या तांदळाचे तर दुसरे रंगीत तांदळाचे काढून एकूण सात चक्रे रचली जातात. चक्राच्या चारही बाजूंना दरवाजे करून त्याजवळ मीठ, उडीद, तांदूळ व राखेचे मारुती बनवले जातात. अकरा कणकेचे दिवे चक्रावर ठेवले जातात. यातील प्रमुख दिवा मेंढ्या म्हणून ओळखला जातो. घरातील अखंड वातीवरून हा दिवा पेटवला जातो आणि पेटताच “अंबे की जय” असा जयघोष केला जातो. या वेळी होमही केला जातो.
चक्रपूजेच्या मुख्य जागी अकरा मांडे गोलाकार ठेवून त्यावर दिवे ठेवले जातात. संपूर्ण कुटुंब, नातेवाईक व मित्रपरिवार यावेळी एकत्र येतो आणि पूजनानंतर चक्रावर ठेवलेले पदार्थ प्रसाद म्हणून ग्रहण करतो.
देशमुख कुटुंबाची परंपरा व पालखीचा मान:
या पारंपरिक पूजेबरोबरच देशमुख कुटुंब वणीतील जगदंबा मातेच्या पालखीचा मान जतन करण्या साठी ही ओळखले जाते. हा मान देवीवरील अखंड श्रद्धा व भक्तीचे प्रतीक आहे. कुटुंबातील एकोपा दृढ व्हावा आणि देवीचे आशीर्वाद सदैव लाभावेत, यासाठीही चक्रपूजा केली जाते.या पुजेची भक्तिभावात सांगता केली जाते पूजा विधी पूर्ण झाल्यानंतर सर्व उपस्थित भाविक व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तिभाव, कौटुंबिक एकोपा आणि अध्यात्मिक वातावरणात देशमुख कुटुंबाची चक्रपूजा यंदाही पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली.