वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील भनवड येथे कौटुंबिक वादातून पतीने विवाहितेवर कात्रीने वार करून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मृत विवाहितेचे नाव रोहीणी सागर गांगोडे (वय २२, रा. लोनवाडी, ता. निफाड, ह.मु. भनवड) असे आहे. पती सागर शिवाजी गांगोडे (वय २८, रा. लोनवाडी) याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे.
शुक्रवार (दि.26) रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास रोहीणी माहेरी भनवड येथे आली होती. त्यावेळी पती सागर तिला आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी आला. मात्र रोहीणीने जाण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या सागरने तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि हातातील कात्रीने छाती, पोट व कमरेवर सलगपणे वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रोहीणीला उपचारासाठी रुग्णालयात नेले, परंतु अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात अंमलदार व्ही. जी. साबळे यांनी गुन्हा क्रमांकान्वये ३१८/२५ भा.दं.सं. २०२३ चे कलम १०३(१), ११५(२), ३५२ अंतर्गत नोंद करण्यात केली आहे. गायत्री एम. जाधव या पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे भनवड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पतीकडून विवाहितेच्या झालेल्या हत्येमुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.