वणी : राष्ट्रीय महामार्गावर अर्ध्या रस्त्यात बेशिस्तपणे वारंवार ट्रक उभे करून ट्रकमधील माल उतरविण्याचे प्रकार होत असल्याने त्याकडे मात्र पोलिस यंत्रणेचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार वणी शहरात होत आहे.
वणी शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. वणी शहरातील बेशिस्त वाहतूक वणीकरांची डोकेदुखी होत आहे. याबाबत ग्रामपंचायत व स्थानिक पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने बेशिस्त वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. देवनदी पुलाजवळ काही वाहने अगदी रस्त्याच्या कडेला लावली जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.
परिसरात विविध दुकानदारांनी दुकाने थाटली असून रस्त्याच्या कडेला अवजड वाहने लावली जात असल्याने समोरुन येणारे वाहने दिसत नाहीत. परिणामी कित्येकदा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. परिसरातील बिल्डिंग मटेरियल विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या मोठे ट्रक ह्या अगदी महामार्गावर रस्त्याच्या अर्ध्यापर्यंत उभ्या केल्या जातात. तीन ते चार तास ही अवजड वाहने अर्ध्या रस्त्यावर लावून लोखंडी सळया उतरवण्याचे धोकादायक काम सुरु असते. याबाबत वारंवार पोलिसांना सांगुनही पोलिस कुठल्याच प्रकारे दखल घेत नाहीत. ही बाब अतिशय गंभीर असुन पोलिस व ग्रामपंचायतने याबाबत त्वरीत कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
ग्रामपंचायत व पोलिसांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी वणी पिंपळगाव राष्ट्रीय महामार्ग असून नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. अनेक भाजी विक्रेते, काही दुकानदार रस्त्याला लागून बसलेले असतात. शहरातील फर्टिलायझर मार्केट येथे नेहमीच वाहतुककोंडी होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहने शहरातील रस्त्यांवर कुठेही, कोणी कशीही लावत आहेत. त्याकडे पोलीसांचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात तक्रार करुनही वणी ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस दखल घेत नाही. ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज देऊन ही ग्रामपंचायत हितसंबंध जोपासण्यासाठी याबाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहेत.