सिडको ( नाशिक ) : अंबड औदयोगिक वसाहतीत रमाबाई आंबेडकर नगर येथे इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी चुंचाळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
युवराज मंगल मगरे ( वय १३ ) रा . रमाबाई आंबेडकर नगर, अंबड औद्योगिक वसाहत अंबड असे जीवनयात्रा संपवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगल मगरे हे रमाबाई आंबेडकर नगर, अंबड औद्योगिक वसाहत, अंबड येथे कुटुंबासमवेत राहतात. सोमवारी (दि.11) रोजी सायंकाळी घरातील सर्व जण पांडवलेणा येथे यात्रेसाठी गेले असता युवराज हा यात्रेला गेला नव्हता. युवराज घरी एकटाच होता. घरातील सर्व जण यात्रेवरून रात्री नऊ वाजता घरी आले असता युवराजने राहत्या घरात किचन रुममध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. त्याच्या आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून युवराज हा अंबड येथील मनपा शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. युवराज घरात एकुलता एक मुलगा असून त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चुंचाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.