नाशिक: सणासुदीच्या आधी संपूर्ण भारतात विविध प्रकारच्या मालसाठवणूकीचे काम जोरात सुरू असल्याने मालवाहतुकीचा प्रमुख निर्देशक असलेले ट्रकभाडे दर सप्टेंबरमध्ये स्थिर होते. मालवाहतूक फ्लीटच्या वापराची पातळी ९० टक्क्यांपर्यंत वाढली असून ती उच्चांकी ठरली आहे. याआधी फ्लीट वापराची पातळी ७० टक्क्यांवर होती.
ट्रकचे भाडे स्थिर, वापरलेल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतींत वाढ
अर्थ मूव्हिंग उपकरणांसह व्यावसायिक, मालवाहतूक वाहन विक्रीत वाढ
कार्ट आणि तीन चाकीसह ई-रिक्षांच्या विक्रीतही वाढ
सप्टेंबरमध्ये इव्ही वाहनांच्या विक्रीत घसरण
कार आणि दुचाकीसह प्रवासी वाहनांच्या विक्रीत घसरण
दिवाळीच्या हंगामामुळे व्यावसायिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहक, कार्टसह ई-रिक्षा आणि तीन-चाकी (मालवाहतूक) या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. बांधकाम क्षेत्रासाठीची वाहने आणि अर्थ मूव्हिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासकामांना पावसाळ्यानंतर चालना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीराम मोबिलिटीतर्फे वाहतूक क्षेत्राचा आढावा घेत त्याबाबत सविस्तर अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांत टायरच्या किमती आणि देशभरातील विविध राज्यांत टोलशुल्कवाढीने मालवाहतुक दरात वाढ होणार असल्याचे संकेत ट्रक मालकांनी दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वापरलेल्या व्यावसायिक वाहन बाजारामध्ये, १.५ ते २ टन श्रेणीच्या वाहनांच्या किमतीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर ७.५ ते १६ टन श्रेणीमध्ये 12 टक्के वाढ झाली. परंतु, 16 ते 19 टन श्रेणीच्या वाहनांच्या दरात १६ टक्के घसरण झाली आहे. वापरलेल्या प्रवासी वाहनांच्या किमतींमध्ये, मारुती कारच्या विक्रीत अनुक्रमे ८ टक्के आणि ७ टक्के अशी सकारात्मक वाढ नोंदवली आहे. परंतु अन्य प्रकारांतील वाहनांना विक्रीत सातत्याने घसरणीचा सामना करावा लागला. घसरणीचा हाच प्रवाह सेकंड हॅण्ड दूचाकींच्या विक्रीतही दिसून आला आहे.
सप्टेंबरमध्ये नवीन कारच्या विक्रीत मासिक आधारावर १४ टक्क्यांनी घट झाली आहे. दुचाकी विक्रीत दरमहा आधारावर १० टक्क्यांनी घट झाली आहे. खरेदीदारांची थांबा आणि वाट पहा ही भूमिका या घसरणीला कारणीभूत मानली जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
विक्रीला चालना मिळण्यासाठी सरकारने विविध उपक्रम राबवूनही ईव्ही विभागात विविध समस्या जैसे थे असल्याचे दिसून आले आहे. खरेदीदार सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. त्यामुळे दुचाकी ईव्हीच्या विक्रीत वार्षिक २३ टक्के आणि ४४ टक्के तर चारचाकी ईव्हीच्या विक्रीत मासिक ३१ टक्के आणि वार्षिक ४३ टक्के घट झाली आहे.
सप्टेंबरमध्ये, पेट्रोलचा वापर सहा टक्क्यांनी, तर डिझेलचा वापर दोन टक्क्यांनी कमी झाला आहे. फास्ट-टॅगचे संकलन ३.२ टक्क्यांनी घटले असले तरी, टोल आकारणी जास्त झाल्यामुळे एकूण टोल महसूल वाढलेला आहे. ई-वे बीलनिर्मिती ऑगस्ट २०२४ मध्ये दरमहा आधारावर स्थिर आहे, परंतु वार्षिक तुलनेत त्यात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.