नगरसुल (नाशिक) : येवला तालुक्यातील नगरसुलसह परिसरात अवकाळी पावसाने शुक्रवारी (दि.27) रात्री 12 ते 1:30 दरम्यान वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने गहू पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. परीसरातील कोळगाव ,वाईबोथी, खिर्डीसाठे, हे.सावरगाव, मातुलठाण, धामोडा, गावांमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला कांदा पावसामुळे सडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कित्येक शेतकऱ्यांनी वावरात काढून ठेवलेल्या कांद्याचे ढिग कागद उडून गेल्याने भिजले आहेत.
कपाशी वेचणीला मजूर मिळत नसल्याने कित्येक शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आहे. कपाशीला शासन अल्प दर देत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नगरसुल परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे गहु तसेच कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा ओला झाल्यामुळे तो सडण्याची भीती आहे. रात्रीच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे नगरसुल तलाठी मंडल क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकांची बांधावर जाऊन पाहणी करावी, अशी सूचना येवला तहसीलदार आबा महाजन यांनी नगरसुलचे तलाठी बापू पवार यांना दिल्या आहेत.
चालू वर्षी रब्बी आणि खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याचप्रमाणे शेतीवर असलेला कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.
शेतकरी नैसर्गिक संकटांना सामोरे जात असून शासनाने तत्काळ विचार करून आर्थिक मदत द्यावी.विजय पोपट पैठणकर, नगरसुल शेतकरी, नाशिक.
दरेगाव : तालुक्यातील पूर्व भागातील गावांना सलग दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणात धुके व पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे रब्बी पीक गहू, हरभरा व कांदे खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना अवेळी आलेल्या पावसाने नुकसान झाले आहे.
सलग दोन दिवसांपासून दरेगाव परिसरात शुक्रवारी (दि. २७) सकाळी पाऊस पडल्याने मका व काढलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कांदे व मका झाकेपर्यंत ओले झाले. काढणीला आलेला कांदा अवेळी आलेल्या पावसाने खराब होत आहे. रात्री व पहाटे झालेल्या पावसाने गहू, हरभरा व कांद्याचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पूर्व भागातील दरेगाव, डोणगाव, दहेगाव, कानडगाव, कुंदलगाव, शिंगवे, मेसनखेडे खु., कोकणखेडे या गावांतही पाऊस झाला.