Junnar Onion Price Pudhari
नाशिक

Nashik Unseasonal Rain March| निफाड-लासलगावला गारपिटीचा भीषण तडाखा! हातातोंडाशी आलेला द्राक्ष आणि कांद्याचा घास निसर्गाने हिरावला

Nashik Unseasonal Rain March| नाशिक जिल्ह्यासाठी द्राक्षाचे आगार मानल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.

पुढारी वृत्तसेवा

निफाड / लासलगाव /मेशीः पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यासाठी द्राक्षाचे आगार मानल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास निफाड शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले.

या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गह आणि द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या भागांत पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांची दाणादाण उडवली आहे.

सध्या अनेक ठिकाणी गहू कापणी शेतात सुरू आहे. पावसामुळे हा गहू भिजल्याने दाण्याला काळपटपणा येण्याची किंवा तो सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, द्राक्षबागायतदारांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. काढणीला आलेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती आहे. यामुळे द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन बाजारभावात मोठी घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिरवाडे वाकदला गारपिटीचा तडाखा लासलगाव : शिरवाडे

वाकद आणि परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. गुरुवारी (दि. १९) दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन आकाश काळ्या ढगांनी व्यापले. तासभर विजांच्या कडकडाटासह तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. गारपिटीचा वेग इतका प्रचंड होता की, काही वेळातच रस्ते आणि शेते पांढरीशुभ्र झाली होती.

गारपिटीमुळे द्राक्षमण्यांना तडे गेल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच काढणीसाठी तयार असलेला आणि शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

उमराणे, दहिवड, डोंगरगावला पाऊस मेशीः देवळा

तालुक्याच्या पूर्व भागात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. तालुक्याच्या पूर्व भागातील उमराणे, दहिवड, डोंगरगाव परिसरात गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास गारांसह पाऊस झाल्याने शेतात उभ्या असलेल्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले.

उन्हाळी कांदा, कांदा बियाण्यांसाठी उभे असलेले डोंगळ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. आंब्यालाही फटका बसला आहे. बुधवारी सायंकाळीदेखील मेशी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. कोटमगाव,

माळेगावला द्राक्षांना तडे लासलगाव : लासलगाव

परिसरातील कोटमगाव, खानगाव आणि खडक माळेगाव शिवारात अचानक जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्याने द्राक्ष, गहू, कांदा, मका तसेच हरभरा पिकांना बसला आहे. विशेषतः द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गारपिटीमुळे द्राक्ष घडांना तडे गेले असून, अनेक घड जमिनीवर पडल्याने उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. निर्यातीसाठी तयार असलेला माल खराब झाल्याने द्राक्ष उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. याशिवाय गहू, कांदा आणि मका पिकांनाही गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

बुधवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीमध्ये सहा एकर द्राक्षांचे नुकसान झाले आहे. ५५ रुपये किलोप्रमाणे या द्राक्षबागेचा व्यापाऱ्यासोबत व्यवहार झाला आहे. द्राक्षांना गारांचा मारा बसल्याने द्राक्षांना तडे गेल्यामुळे व्यापारी द्राक्ष घेण्यास तयार नाही. त्यामुळे सरकारने पंचनामे करत एकरी दोन ते तीन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी
-संजय शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी
खडक माळेगाव अडीच एकर शेतामध्ये गव्हाच्या पिकाची लागवड केली असून, गहू आता काढणीला आलेला असताना अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू आडवा झाला. सरकारने एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
- नंदू मोरे, गहू उत्पादक शेतकरी, कोटमगाव
कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, कांद्याच्या पातीला गारांचा तडाखा बसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. एकरी ६० ते ७० हजार रुपये कांद्याच्या पिकाला खर्च आला आहे.
- नवनाथ भिलोरे, कांदा उत्पादक शेतकरी, खानगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT